Breaking
Updated: मार्च 2, 2026
संतांची सर्वधर्मसमभाव शिकवण गरजेची - डॉ.कराड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसंतांची सर्वधर्मसमभाव शिकवण गरजेची – डॉ.कराड
परळी – वर्चस्ववादी विचाराने वैदिकांनी धर्माच्या नावावर समाजात पसरवलेली गुलामगिरी मोडीत काढणाऱ्या जगतगुरू तुकोबारायांच्या गाथा बुडविल्या, त्यांचे चारित्र्य विकृत पद्धतीने प्रसारमाध्यमातून समोर आणत प्रतिमा मलिन केली जात असताना संतांचे विवेकनिष्ठ विचार तळागळाला नेण्याचे काम हे कीर्तन महोत्सव करत असल्याचे प्रतिपादन विवेकवादी वक्ते तथा सिने अभिनेते किरण माने यांनी केले तर “एक नारायण सर्वत्र दिसे भेदाभेद न मानावे” अशी सर्वधर्म समभावाची संत तुकोबारायांच्या शिकवणीची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज असल्याचे डॉ.डी.एल.कराड यांनी सांगितले. जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजे निमित्ताने आयोजित गाव समूहाच्या शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उदघाटन संतसाहित्य अभ्यासक तथा सिने अभिनेते किरण माने, कामगारांचे राष्ट्रीय नेते डॉ.डी. एल.कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि 28 रोजी कान्नापूर येथे संपन्न झाले.
आपल्या अभ्यासपूर्ण संत विचारांची मांडणी करताना किरण माने यांनी सांगितले की, समाजात वर्चस्ववादी विचार रुजविण्यासाठी काही शक्ती प्रयत्नशील असून संत, महापुरुष यांच्या एक-दोन चांगल्या गोष्टीसोबत त्यांची प्रतिमा मलिन करून चारित्र्य विकृती करणाऱ्या खोटा समज समाज मनावर रुजविण्याचे काम सुरू असून अंधश्रद्धा, भोंदूगिरी याचा पगडा घट्ट होत असताना ” जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं ॥१॥ अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥” तुकोबारायांच्या अभंगातून सांगितल्याप्रमाणे तीर्थयात्रेला जाऊन, पवित्र नद्यांमध्ये स्नान करून वर वर देहाची कातडी धुवून उपयोग नाही तर अंतकरण शुद्ध असणे गरजेचे आहे. तुकोबाराय उत्कृष्ट अर्थतज्ञ, राजनीतीकार, मानसोपचार तज्ञ, कुशल व्यावसायिक यासोबत कृषी तज्ञ देखील असल्याचे सांगत ” जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥ उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥” असा व्यवसाय समृद्धी करण्याचा तर ” सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिक आलें परी केलें पाहिजे जतन ॥ सोंकरीं सोंकरीं सोहंकरी । विसावा तों वरी नको उभें आहे तों ” हा दाखला देत शेतकऱ्यांनी आपल्या शेताची आणि शेतातील पिकांची निगा कशी राखावी हे शेकडो वर्षांपूर्वी आपल्या गाथेतून सांगितले आहे. संतांचे, महापुरुषाचे विचार आजमितीस नाशविण्याचे काम मोठ्या शक्तीने सुरू असून हा शेतकरी कीर्तन महोत्सव विवेकनिष्ठ संत विचार तळागाळात पोहचविण्याचे काम करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे त्यांनी सांगितले तर अध्यक्षस्थानी असलेले कामगारांचे नेते डॉ.कराड यांनी वारकरी संप्रदायाचे बाजारीकरण झाले असताना संतांनी मांडलेला समतेचा, कष्टाचा विचार हा भौतिक बदलापेक्षा अंतर्मन बदलून माणूस म्हणून जगण्याचे सामर्थ्य या कीर्तन महोत्सवातुन साध्य होऊ शकते. “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ या उक्तीप्रमाणे संपूर्ण जग हे विष्णुमय अर्थात मानवतावादी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेदाभेद मानणे हे अमंगळ असून जातीभेद असो व धर्मभेद. कुणाचाही मत्सर किंवा हेवा न करता “जे कां रंजले गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥” हे प्रत्येकाने जाणूनघेऊन संतांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे असे सांगितले.
या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी स्वतः शेतकरी आणि ज्यांची दोन्ही पाल्य स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन उच्च पदस्थ अधिकारी बनलेले आहेत असे जागरूक पालक असलेले हभप मधुकर महाराज बारुळकर संत विचार मंथन मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी संयोजकांनी बारुळकर महाराज यांचा यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ब्रम्हानंद देशमुख तर ऋणव्यक्त विशाल देशमुख यांनी केले. या उदघाटन प्रसंगी पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ, शेतकरी व महिलांची उपस्थिती होती. उदघाटन सत्रानंतर नामदेव-तुकाराम परिषदेचे हभप मधुकर महाराज बारुळकर यांचे कीर्तन संपन्न झाले. पहिल्या दिवशी दुपारी म्हतारगाव तर रात्री सरफराजपूर ग्रामस्थांनी भोजन पंगतीचे जबाबदारी पूर्ण केली.