जादा परतावा देण्याच्या आमिषाने नऊ जणांना घातला ६६ लाखाला गंडा

केज – रिअल इस्टेटमध्ये काम करीत असलेल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा दराने परतावा देण्याचे आमीष दाखवून केजमधील नऊ जणांना ६६ लाख ७० हजार रुपयाला गंडा घातला. याप्रकरणी अहिल्यानगर येथील ब्रिक्स सोल्युशन कंपनीचे मालकासह त्यांचा व्यावसायिक भागीदार असल्याचे सांगून फसवणूक करणारा जिवाचीवाडी (ता. केज) येथील एकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज येथील समता नगर अजय बबनराव मिसाळ याने त्यांचे गल्लीत राहत असलेला बाळासाहेब सखाराम चौरे (रा. जिवाचीवाडी ता. केज) व निलेश काळे याचेकडुन ब्रिस्क सोल्यूशन, (मोशी, जि. पुणे) या कंपनीचे मालक प्रशांत राधा कृष्ण होन (रा. कोल्हार ता. राहता जि. अहिल्यानगर) यांची ओळख झाली. प्रशांत होन व बाळासाहेब चौरे याने अजय मिसाळ यास त्यांची ब्रिस्क सोल्यूशन हि कंपनी पुण्यामध्ये रिअल इस्टेटचे काम करते. या कंपनीमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली, तर एक वर्षानंतर चांगल्या प्रकारचा परतावा भेटेल. कपंनीने पुण्यामध्ये बांधकाम केलेल्या फ्लॅटपैकी एक वन बी.एच. के. फ्लॅट तुम्हाला भेटेल असे सांगितले. तसेच या अगोदर कपंनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना योग्य मोबदला दिलेला आहे. असे सांगितले. तर बाळासाहेब चौरे याने तो स्वतः ब्रिस्क सोल्यूशन कंपनीमध्ये पार्टनर असून यातून बराच परतावा भेटेल असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून सन २०२२ मध्ये अजय मिसाळ यांनी २० लाख रुपये, निखील काळे यांनी १९ लाख ७० हजार रुपये, विश्वजीत नवनाथ बारगजे यांनी ९ लाख रुपये, हरिभाऊ बहीरे यांनी २ लाख ५० हजार रुपये, अजहर अश्रफ शेख यांनी २ लाख रुपये, भागवत काशीनाथ काळे यांनी ३ लाख रुपये, अमोल बबनराव मिसाळ यांनी ४ लाख रुपये, अभय मोहनराव शिंदे यांनी ५ लाख रुपये, अनंत मिसाळ यांनी १ लाख ५० हजार रुपये वेगवेगळ्या बँकेतून ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविले. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये पैसे परत घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केली. प्रत्येक वेळी पुढची तारीख सांगत होते. त्यांची चौकशी केली असता ते दोघे कंपनी बंद करून दुबईला गेले असल्याचे समजले. तसेच जानेवारी २०२५ मध्ये प्रशांत होन आणि बाळासाहेब चौरे यांच्याविरुद्ध सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे असाच गुन्हा दाखल झाल्याचे माहीत झाले. यामुळे अजय मिसाळ आणि कंपनीत पैसे गुंतविणारे इतरांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ११ जून रोजी केज पोलीस ठाण्यात ब्रिक्स सोल्युशन कंपनीचे मालक प्रशांत होन आणि त्यांचा पार्टनर बाळासाहेब चौरे याच्याविरुद्ध तक्रार दिल्याने तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे करीत आहेत.
—–
गतवर्षी एकाचा मृत्यू
—–
अजय मिसाळ याचा मित्र निलेश काळे यांचा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्याने त्याचा ताण येऊन त्यांचा चाकण (जि. पुणे) येथे १२ एप्रिल २०२४ रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला.