Home »
Kaij » राजश्री उमरेच्या उपोषणाकडे दुर्लक्ष ; कोरडेवाडी ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन
राजश्री उमरेच्या उपोषणाकडे दुर्लक्ष ; कोरडेवाडी ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन
Updated: ऑक्टोबर 11, 2025
कोरडेवाडी ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन
केज – कोरडेवाडीत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजश्री उमरे पाटील यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी शनिवारी (दि. ११) टोकवाडी रस्त्यावरील तलावात जलसमाधी आंदोलन केले. महसूल व पोलीस प्रशासनाने समजूत काढल्याने व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने अडीच तासाने आंदोलन मागे घेतले.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने कोरडेवाडी येथे राजश्री उमरे पाटील यांनी कोरडेवाडीच्या नियोजित साठवण तलावाला पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार नुकसान भरपाई देण्यात यावी, ज्ञानाराधा मधील ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात याव्यात या मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. मात्र त्यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ ही आक्रमक बनले. शनिवारी सकाळी ग्रामस्थ व कार्यकर्ते हे गावापासून जवळ असलेल्या टोकवाडी रस्त्यावरील साठवण तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत पाण्याबाहेर न येण्याचा इशारा दिला. तर याचवेळी गोरख शिंदे व पप्पू शिंदे यांच्या पोटात पाणी जाऊन ते पाण्यात बुडत असताना अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. उपचारासाठी त्या दोघांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. काही आंदोलक हे झाडावर चढले होते. नायब तहसीलदार अशोक भंडारे व केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी तलावात उतरून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करीत समजूत काढली. तर बीडच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत तलावाच्या संबंधित कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्ते पाण्याबाहेर आले.
अन्यथा आत्मदहन करू
आता दोन दिवसानंतर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करू, असा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांनी दिला आहे.