Breaking
Updated: जानेवारी 15, 2026
प्रदीप फाटे याच्यावर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: माजलगाव शहरातील नवा मोंढा परिसरातील एका मालमत्तेचे खरेदीखत करण्यासाठी नगरपरिषदेचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र वापरून निबंधक कार्यालयाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माजलगावचे सह दुय्यम निबंधक अनिल रामसिंग जव्हेरी यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती, मात्र नगरपरिषदेच्या पडताळणी अहवालानंतर आता यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
बाळासाहेब तुकाराम जोगडे (वय ४५, राहणार देवखेडा) यांनी त्यांची मालमत्ता क्रमांक १०-११८/६-३३४/१ ही प्रल्हाद सूर्यकांत होके (वय ५१, राहणार झेंडा चौक, माजलगाव) यांना विक्री करण्यासाठी दस्त नोंदणीला दिला होता. या व्यवहारासाठी इम्रान मुस्तफा खान (वय ३६, राहणार गांधनपुरा) आणि प्रकाश उत्तमराव होके (वय ५४, राहणार पाटील गल्ली) यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या. या आरोपींनी संगनमत करून नगरपरिषद माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार केले आणि ते निबंधक कार्यालयात खरे असल्याचे भासवून सादर केले.
या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, संबंधित प्रमाणपत्रावर तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक विघ्नेश रत्नाकर मुंडे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नोंदणी अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड हे करत आहेत