Breaking

कर्नाटक राज्यातील बालिकेस सुखरूप कुटुंबाकडे केले सुपूर्द

Updated: ऑक्टोबर 6, 2025

By Vivek Sindhu

कर्नाटक राज्यातील बालिकेस सुखरूप कुटुंबाकडे केले सुपूर्द

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रशासन व युवा ग्राम संस्थेच्या समन्वयातून यशस्वी बचाव व पुनर्वसन

केज – कर्नाटक राज्यातील रायचूर येथील आशापुर जनता कॉर्टर येथील एक अल्पवयीन बालिका कोणतीही पूर्वसूचना न देता ११ सप्टेंबर २०२५ रोजी रेल्वेने परळी रेल्वे स्थानकावर दाखल झाली होती. परळी रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाने तात्काळ सदर बालिकेस आपल्या ताब्यात घेत तिची प्राथमिक चौकशी केली. या प्रक्रियेनंतर युवा ग्राम विकास मंडळ संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात आला. संस्थेच्या कार्यकर्त्या अस्मिता इंगळे यांच्या पुढाकाराने आणि इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने सदर बालिकेस बालकल्याण समिती, बीड यांचेसमोर सादर करण्यात आले. बालकल्याण समिती, बीड यांनी “बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५” अंतर्गत या बालिकेस सावित्रीबाई फुले शासकीय निरीक्षण गृह, अंबाजोगाई येथे राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर युवा ग्राम विकास मंडळ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या बालिकेच्या मूळ निवासस्थानाचा शोध घेत तिच्या पालकांशी संपर्क साधला. सामाजिक तपासणी अहवाल सादर केल्यानंतर बालकल्याण समिती, बीड यांच्या आदेशाने सदर बालिकेस ४ ऑक्टोबर रोजी बालकल्याण समिती, रायचूर (कर्नाटक) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत बीडच्या बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे व सदस्य संतोष वारे, सुरेश राजहंस, छाया गडगे, रेल्वे सुरक्षा दलाचे एस. बी. कांबळे, निरीक्षण गृहाचे अधीक्षक ओमकार अकुसकर, युवा ग्राम विकास मंडळ संस्थेचे कार्यकर्ते संतोष रेपे, अस्मिता इंगळे, सुनीता विभुते, मनीषा स्वामी, प्रकाश काळे यांनी समन्वय साधत अतिशय संवेदनशीलता व जबाबदारीने काम पार पाडले.

या यशस्वी समन्वयातून सदर बालिकेस सुखरूपपणे तिच्या मूळ निवासस्थानी व पालकांकडे सुपूर्त करण्यात आले असून, सर्व संबंधित यंत्रणांचे यासाठी प्रशासना कडून मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.

जिल्ह्यामध्ये कोठेही बेवारस बालक आढळून आल्यास बालकल्याण समितीशी संपर्क साधावा. अथवा बालकल्याण समितीकडे घेऊन यावे त्यास संरक्षण व त्याचे पुनर्वसन करता येईल.

अशोक तांगडे
अध्यक्ष, बालकल्याण समिती बीड.


Categories

Recent Posts