बीड : पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतअल्पवयीन आदिवासी मुलाला जबरदस्ती मजुरीला लावून मारहाण आणि धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवा हानुमंत पवार (वय अंदाजे १५, रा. पाचेगाव, ता. गेवराई) याने दिलेल्या तक्रारीनुसार, सहा-सात वर्षांपूर्वी फिर्यादीच्या आई-वडिलांनी उसतोडणीचे पैसे घेऊन मजूर पुरवले होते. मात्र मजूर काम सोडून पळून गेल्याने त्यांचे पैसे बाकी होते. त्या बदल्यात आरोपींनी फिर्यादीला आपल्या ताब्यात ठेवून कामाला लावले.
आरोपी अमोल शिंदे व प्रविण शिंदे (रा. आथरवण पिंप्री, ता.बीड) यांनी अल्पवयीन शिवाला म्हशीचे शेण काढणे, झाडू मारणे, शेळ्या-म्हशी सांभाळणे अशी कामे करवून घेतली. काही चूक झाल्यास त्याला मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच तो आदिवासी समाजातील असल्याचे माहीत असूनही त्याला शिवीगाळ करून अत्याचार केला. भयभीत झाल्याने तो अल्पवयीन मुलगा तेथून पळून गेला.
या प्रकरणी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अत्याचार कायदा आणि बालकामगार अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनपुडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.