Breaking
Updated: ऑक्टोबर 11, 2025
कृषी विज्ञान केंद्र डीघोळअंबाचा उपक्रम
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकृषी विज्ञान केंद्र डीघोळअंबाचा उपक्रम
अंबाजोगाई (दि. 11 ऑक्टोबर) – भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक, तांत्रिक व उत्पादनक्षम विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते “पीएम धन-धान्य कृषी योजना” व “कडधान्य आत्मनिर्भरता मिशन” तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी, पशुपालन, मत्स्यपालन आणि खाद्य प्रक्रिया क्षेत्रातील २१०० हून अधिक योजनांचे उद्घाटन व शिलान्यास कार्यक्रम ११ ऑक्टोबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाला. राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांच्या १०९ व्या जयंतीच्या औचित्याने या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम दीनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, डिओळअंबा (ता. अंबाजोगाई) येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. वसंत देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, दीनदयाल संशोधन संस्था कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई हे होते. तर प्रमुख उपस्थिती राहुल गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई, जनार्धन भगत तालुका कृषी अधिकारी धारूर, रवी मुंडे तालुका कृषी अधिकारी परळी यांची होती.
उद्घाटन पर मार्गदर्शनात नंदकिशोर मुंदडा म्हणाले की दीनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदय ही संकल्पना साकारण्याकरता नानाजी देशमुख यांनी जे स्वप्न पाहून कार्य केले हे एक आदर्शवत होते. आगामी काळात सुद्धा समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून काम करू व जिल्ह्यातील समाज सक्षम करू.
प्रास्ताविक करताना राहुल गायकवाड म्हणाले की सध्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान चालू असून या अंतर्गत तेलबिया पिकांचे तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम चालू आहे. आजच्या या प्रसंगी शेतकरी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आयोजन केले असून त्याचा पुढील हंगामात सर्वांना फायदा होणार आहे.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. वसंत देशमुख म्हणाले की श्रध्येय नानाजी देशमुख यांनी सातत्याने पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शन विचार संकल्पनेतुन काम केले असून ग्राम स्वावलंबन अभियानाच्या माध्यमातून त्यांनी स्वावलंबी शेतकरी निर्माण केले. याच संकल्पनेतून आत्मनिर्भर शेतकरी व समाज निर्माण करण्याचे कार्य हे कृषी विज्ञान केंद्र करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या थेट प्रक्षेपण समारोहानंतर शेतकरी व कृषी विभागाच्या कर्मचारी साठी रबी हंगामातील पिकाच्या मार्गदर्शनासाठी तांत्रिक सत्र आयोजित केले होते. या मध्ये विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी तूर व हरभरा या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन केले. हरभरा पिकातील उत्पादन वाढीसाठी पिकाच्या सुधारीत वाण निवड, टोकण लागवड पद्धतीचा वापर, बीज प्रक्रिया, प्रवाही सिंचन पद्धतीचा वापर टाळून तुषार सिंचन पद्धतीने 2 पाणी देणे व एकात्मिक कीड नियंत्रण करणे या पंचसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले.
केंद्राचे पिक संरक्षण शास्त्रज्ञ प्रदीप सांगळे यांनी तूर, कापूस व हरभरा पिकातील कीड व रोग नियंत्रण विषयक मार्गदर्शन केले. हरभरा पिकातील घाटेअळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे एकरी 5 लावावेत तसेच जैविक बीटी पावडर चा वापर व पक्षीथांबे यांची उभारणी फायदेशीर ठरते असे सांगितले.
केंद्राचे कृषी विद्या शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी सांगितले की सध्या खाद्यतेल आयात वर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून तो कमी करून आत्मनिर्भर होण्यासाठी तेलबिया पिकाचे क्षेत्र व उत्पादकता वाढण्याची गरज आहे. रबी हंगामातील करडई, जवस या पिकाच्या सुधारीत वाणाची माहिती त्यांनी उपस्थितांना दीली.
केंद्राचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी यांनी नैसर्गिक शेती विषयक तर पशु विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र कोरके यांनी दुग्धोत्पादनात मेटाबोलाइटसचा वापर फायदेशीर असल्यचे सांगुन सुरभी पशुखाद्य केंद्रावर उपलब्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्राचे कृषी अभियंता प्रमोद रेणापुरकर यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य शेतकरी, उप कृषी अधिकारी, व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.