Breaking
Updated: नोव्हेंबर 5, 2025
फलटण प्रकरणातील आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने शासकीय सेवेतून बडतर्फ
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसातारा : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी अटक असलेले आणि बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी ठरलेले निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यास अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक सुनील फुलारी यांनी पदास अशोभनीय, नैतिक अध:पतन आणि समाजात असुरक्षितता निर्माण करणारे वर्तन केल्याबद्दल ही कारवाई केली. ही बडतर्फी दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ पासून प्रभावी करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रक सातारा पोलिस अधीक्षकांनी प्रसिद्ध केले.
फलटण शहर पोलिस ठाण्यातील प्रकरणानुसार, आरोपी गोपाळ बदने याने आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केला होता. पोलिस उपनिरीक्षक म्हणून त्याचे वर्तन हे पोलिस खात्याच्या सन्मानास अशोभनीय ठरले. त्यामुळे त्याला सेवेत ठेवणे हे सार्वजनिक व लोकहिताच्या दृष्टीने अनुचित ठरेल, असे कारण देत बदने यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले. गोपाळ बदने हा मुळचा बीड जिल्ह्यातील चांदापूर (ता. परळी) येथील आहे.
दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने शहरातील एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे नमूद होती. त्या डॉक्टरने बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा तर प्रशांत बनकरने पाच महिन्यांपासून छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता.
यानंतर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध बलात्कार, छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेने वैद्यकीय व पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली होती. पुढील तपास फलटण शहर पोलिसांकडून सुरू आहे.