Breaking
Updated: फेब्रुवारी 28, 2026
ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर; मंगल कार्यालयांच्या गोंगाटाने रुग्ण आणि नागरिक हैराण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाई शहरात लग्नसराईच्या हंगामाला उत्साहात सुरुवात झाली असली तरी, मंगल कार्यालयांतून येणारा कानठळ्या बसवणारा आवाज आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या डीजेच्या धिंगाण्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः जवळपासच्या रुग्णालयातील रुग्णांचे आरोग्य आता गंभीर धोक्यात आले आहे. ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या गोंगाटामुळे हृदयविकार असलेल्या आणि अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांना तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासकीय यंत्रणेचे या वाढत्या त्रासाकडे होणारे दुर्लक्ष आणि मंगल कार्यालय चालकांची बेजबाबदार वृत्ती यामुळे रहिवासी क्षेत्रांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली असून वैद्यकीय क्षेत्रातूनही याबद्दल आता तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
ध्वनी प्रदूषण नियम २००० नुसार रुग्णालय आणि शाळांच्या १०० मीटर परिसरात ‘सायलेंट झोन’ घोषित करण्यात आलेला असून तिथे लाऊडस्पीकर लावण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. मात्र अंबाजोगाई शहरात अनेक ठिकाणी रुग्णालयांच्या अगदी शेजारी असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये दिवसरात्र मोठ्या आवाजात वाद्ये वाजवून आणि मोठ्या आवाजाचे फटके वाजवून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलची आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली असताना, प्रत्यक्षात मात्र ही मर्यादा कित्येक पटीने ओलांडली जात आहे. आधी हळदी सारखे कार्यक्रम आटोपशीरपणे व्हायचे. आता रात्री १० वाजेनंतर लाऊडस्पीकर वापरण्यावर कायदेशीर बंदी असूनही अनेक ठिकाणी असे कार्यक्रम अर्ध्या रात्रीपर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावून सुरु असतात, ज्याकडे स्थानिक पोलिसांकडूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.
केवळ आवाजाचाच प्रश्न नसून नवरदेवाच्या मिरवणुकीत रस्त्याच्या मधोमध डीजे लावून तासनतास नाचण्याच्या प्रकारामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यासोबतच बहुतांशी मंगल कार्यालय चालकांनी पार्किंगच्या शिस्तीकडे पूर्णपणे पाठ फिरवली असून रस्त्यावर होणाऱ्या अस्ताव्यस्त गर्दीमुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही मंगल कार्यात व्यत्यय आणण्याचा उद्देश नसला तरी रुग्ण आणि ज्येष्ठांच्या आरोग्याचा विचार करून स्वतःहून आवाजावर मर्यादा पाळणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे.
या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अत्यंत कडक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून नियमांचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आणि फौजदारी कारवाईची तरतूद कायद्यात आहे. विनापरवाना लाऊडस्पीकर वापरल्यास तो जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. तरीही सद्यस्थितीत नियमांची अंमलबजावणी केवळ कागदावरच असल्याचे विदारक चित्र दिसत असून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाने आता तातडीने आणि कठोरपणे हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरत आहे.