Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Updated: फेब्रुवारी 20, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 02 20 at 3.36.30 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ऐपत प्रमाणपत्रासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी, एसीबीची कारवाई

परळी: येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे याचे नाव एका लाच प्रकरणात समोर आल्याने जिल्ह्याच्या महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सोल्वन्सी अर्थात ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी एका तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून कारवाई केली असून तहसीलदार मुंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराला कामासाठी सोल्वन्सी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे याने सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने याबाबत बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पडताळणी केली असता, तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे स्पष्ट झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परळी येथे नियोजनबद्ध सापळा रचला. कारवाई दरम्यान तहसीलदार मुंडे यांस तक्रारदाराच्या हालचालींचा संशय आल्याने त्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र, एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीबाबतचे भक्कम तांत्रिक पुरावे संकलित केले आहेत. या पुराव्यांच्या आधारे संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या कारवाईमुळे परळी तहसील कार्यालयासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिकांनी एसीबीच्या या धडक कारवाईचे स्वागत केले असून, शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अशा कठोर पावलांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.


Categories

Recent Posts