Breaking

पंढरपूरला पिकनिकला निघालेली दोन अल्पवयीन मुले पालकांकडे सुपूर्द

Updated: ऑक्टोबर 16, 2025

By Vivek Sindhu

रेल्वे पोलीस, युवाग्रामची सतर्कतेमुळे अनर्थ टळला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रेल्वे पोलीस, युवाग्रामची सतर्कतेमुळे अनर्थ टळला

केज – हदगाव (जि. नांदेड) तालुक्यातील दोन अल्पवयीन मुले ही आपल्या आई वडिलांना न सांगता पंढरपूरला पिकनिकला निघाली होती. रेल्वेत संशयास्पद आढळून आल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर केजच्या युवाग्राम विकास मंडळाने त्या मुलांना सुरक्षितपणे पालकांकडे सुपूर्द केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

परळी येथील आरपीएफचे कॉन्स्टेबल बी. मदनकुमार हे १५ ऑक्टोबर रोजी लातूर रोड रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना त्यांना निजामाबाद – पंढरपूर या ट्रेनच्या (ट्रेन क्रमांक ११४१३) एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये दोन अल्पवयीन मुलांना संशयास्पद स्थितीत बसलेले आढळले. त्यांनी या मुलांची चौकशी केली असता प्रणव नारायण हनवटे (वय १५, रा. कृष्णापूर, ता. हदगाव, जि. नांदेड) व शंतनू शंकर काळबांडे (वय १५, रा. रुई, ता. हदगाव, जि. नांदेड) अशी त्यांची नावे व ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असल्याचे व शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांनी पालकांना न सांगता पंढरपूर पिकनिकला जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) तात्काळ दोन्ही मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले. त्यांनी युवा ग्राम व बाल कल्याण समितीशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच युवा ग्राम विकास मंडळचे संतोष रेपे आणि एसआयपीएफ व पीआरएलआय यांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. पालक १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता परळीत पोहचले. बीडच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांच्या मार्गदर्शनानुसार, योग्य लेखी प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपवण्यात आले. या संपूर्ण कारवाईत आरपीएफ परळीचे कॉन्स्टेबल बी. मदन कुमार, एसआयपीएफचे एम. किशोर व युवाग्राम विकास मंडळाचे संतोष रेपे यांनी तत्परता, दक्षता व समन्वय राखून संभाव्य दुर्घटना टाळली. दोन्ही मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले.

अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी पालक, शाळा व समाज यांचे सतत लक्ष व सजगता आवश्यक आहे. अशा कोणत्याही घटनांची त्वरित माहिती पोलीस किंवा संबंधित संस्थांना देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

संतोष रेपे
समन्वयक, युवाग्राम विकास मंडळ, केज.


Categories

Recent Posts