Home »
Kaij » बेंगळवाडीत पाणलोट क्षेत्र विकासासह युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मिती
बेंगळवाडीत पाणलोट क्षेत्र विकासासह युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मिती
Updated: ऑक्टोबर 25, 2025
ओवेन्स कॉर्निंग, जनविकास सामाजिक संस्थेचा पुढाकार
ओवेन्स कॉर्निंग, जनविकास सामाजिक संस्थेचा पुढाकार
केज – डोंगरदऱ्यात वसलेल्या बेंगळवाडी (ता. केज) येथे ओवेन्स कॉर्निंगच्या सहकार्यातून जनविकास सामाजिक संस्थेने पुढाकार घेत पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घेऊन सीसीटी डीप, सीसीटी माती नाला बांध, बांध बंधिस्ती, सीएनबी नाला सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, जुने पाणी स्त्रोताचे दुरुस्ती व बळकटीकरण केले आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय गावातील ५० युवकांना स्वयंरोजगार निर्मिती करून स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
बीड जिल्ह्याची ऊसतोड कामगार पुरविणारा दुष्काळी जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांचे अवकाळी व अतिवृष्टीने जीवनमान उंचावले जात नसून शेतीशिवाय इतर उत्पन्नाचे व जगण्याचे साधन नसल्याने अनेक जण ऊसतोड मजूर व रोजगारासाठी स्थलांतरित होतात. तर बीड जिल्ह्यातील बेंगाळवाडी (ता. केज) हे गाव डोंगरदऱ्यात वसलेले असून जमीन ही मुरमाड व डोंगराळ आहे. त्यामुळे पडलेले पावसाचे पाणी शिवारात न थांबता व शेतीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे गावातील ७० टक्के लोक हे रोजगारासाठी हंगामी ऊसतोड कामगार म्हणून प्रत्येक वर्षी स्थलांतरित होतात. या गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व युवकांच्या हाताला स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ओवेन्स कॉर्निंगच्या सहकार्यातून जनविकास सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. त्यामुळे शेतात उत्पन्न निघण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत मिळाली आहे. तर ५० युवकांच्या हाताला विविध प्रकारचे स्वयंरोजगार मिळवून देण्यात आल्याने येणाऱ्या काळात या गावातील ऊसतोड मजुरांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
पाणलोट क्षेत्र विकासाची कामे राबविली
ओवेन्स कॉर्निंगच्या सहकार्यातून जनविकास सामाजिक संस्थेने बेंगाळवाडीत १३० हेक्टर क्षेत्रातील शेत शिवारातील डोंगर दरी व जमिनीवरती, नदी नालेवर सीसीटी डीप, सीसीटी माती नाला बांध, बांध बंधिस्ती, सीएनबी नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकरण, जुने पाणी स्त्रोताचे दुरुस्ती व बळकटीकरण ही कामे केली आहेत. त्यामुळे शिवारातील डोंगरावरून वाहून जाणारे पाणी शिवारातच अडवून मुरणार आहे. त्यातून जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असे यशस्वी काम झाले आहे.
५० युवकांना गाव पातळीवर स्वयंरोजगार
बेंगाळवाडीत गाव पातळीवर शेतीशी निगडित गाय, शेळी, कोंबडी पालन व दुग्ध व्यवसाय म्हणून खवाबट्टी, किराणा दुकान, चिकन शॉप, मोटार दुरुस्ती, शिलाई मशीन असे ५० युवकांचे छोटे छोटे स्वयंरोजगार उभे राहिल्याने त्यांना गावात रोजगार निर्मिती झाली आहे. या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.