Breaking
Updated: जानेवारी 13, 2026
संकटाला जो खंबीरपणे सामोरे जातो तोच जीवनात यशस्वी होतो: ॲड. संतोष पवार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – संकट ही माणसाची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. जो संकटांच्या काळात डगमगून न जाता खंबीरपणे त्यांचा सामना करतो, तोच माणूस जीवनाच्या शर्यतीत खऱ्या अर्थाने यशस्वी होतो, असे प्रतिपादन आधार माणूसीचा या उपक्रमाचे ॲङ संतोष पवार यांनी सोमवारी (दि. 12) केले.
आपेगाव येथील जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. एन. के. हजारे हे होते. तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक पवार गुरुजी, प्रा. पी. एस. तरकसे, ॲड. संतोष पवार, प्रांजली गुळभीले, अनुजा तपकिरे, सादिया शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना ॲङ संतोष पवार म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुण मिळवणे म्हणजे यश नाही. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये संकटांचा सामना करण्याची मानसिक ताकद निर्माण व्हायला हवी. संकटे ही आपल्याला संपवण्यासाठी नसून आपल्यातील सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी असतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक प्रा. एन. के. हजारे म्हणाले की, जिजाऊंनी शिवरायांना घडवले आणि स्वामी विवेकानंदांनी भारताच्या तरुणाईला जागृत केले. या दोन्ही महापुरुषांचे जीवन आपल्याला संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग दाखवते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अशा थोर व्यक्तींच्या विचारांचा आदर्श घेऊन आपल्या आयुष्याची जडणघडण करावी. मंचावरील पाहुणे पवार गुरुजी यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख एस. व्ही. देशमुख यांनी केले तर सर्वांचे आभार जे. पी. काकडे यांनी मानले.