Breaking
WhatsApp Group
Join Nowबीड – महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ‘ई-चावडी प्रणाली’ लागू करण्यात आली आहे. ग्राम महसूल अधिकारी यांच्या दप्तरातील गाव नमुने 1 ते 21 ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक गावातील महसूल मागणी निश्चिती करणे आणि त्यानुसार महसुलाची वसुली या प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सध्या प्रगतीपथावर आहे.नागरिकांकडून जमा होणाऱ्या रकमा दररोज बिनचूकपणे जमा करण्याची कार्यवाही करणे, ही ई-चावडी प्रणालीतील आकारणी विषयक अद्ययावतीकरण टप्प्याची अंतिम आणि महत्त्वपूर्ण पायरी आहे. प्रशासनाने या प्रक्रियेला अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. या उद्देशाने, ई-चावडी प्रणाली मधील आकारणी विषयक अद्ययावतीकरणात ‘ई-चावडी नागरिक पोर्टल’ वरील “End to End Payment” सुविधा वापरून महाराष्ट्रातील सर्व जमीन धारकांना जमीन महसूल रक्कम ऑनलाईन जमा करण्याची अभिनव सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, जिल्हाधिकारी, विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी, हरिष धार्मिक यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील जिल्हा नियोजन सभागृह येथे जिल्ह्यातील सर्व ग्राममहसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्यासाठी ‘ई-चावडी प्रणाली अद्ययावत करण्या संदर्भात विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, नरेंद्र कुलकर्णी, आणि तहसीलदार, चंदकांत शेळके हे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाचे मार्गदर्शन उमरगा तहसील कार्यालयातील मास्टर ट्रेनर सुशांत गिरी यांनी केले.या प्रशिक्षण सत्रात ई-चावडी प्रणालीच्या अद्ययावतीकरणाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत ई-चावडी प्रणाली पूर्णपणे अद्ययावत करण्यात येणार असून, त्यानंतर दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासून प्रत्येक गावातील महसूल मागणी निश्चिती आणि त्यानुसार महसुलाची वसुली या प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत.ही सुविधा नागरिकांना जमीन महसूल भरणा करण्यासाठी अधिक सोयीची ठरेल, तसेच प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यास मदत होईल.
Last Updated: June 20, 2025