Breaking

जनकल्याण द्रुतगती मार्ग अंबाजोगाई आणि केज मार्गेच ठेवा; खा. रजनी पाटील यांची मागणी

Updated: डिसेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

नियोजित द्रुतगती मार्गात बदल करू नये : खा रजनी पाटील

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: लातूर ते मुंबई हे १० ते १२ तासांचे अंतर अवघ्या ४ ते ५ तासांत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने ‘जनकल्याण द्रुतगती मार्ग’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केला आहे. मात्र या मार्गाच्या नियोजित आराखड्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्ताने चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार रजनी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा मार्ग मूळ नियोजित आराखड्याप्रमाणेच अंबाजोगाई, केज आणि बीड मार्गे ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही माध्यमातून हा मार्ग लातूर-कळंब-पाडा-ईट-खर्डा-जामखेड असा नेण्याचे नियोजन असल्याचे समोर आले आहे. यावर आक्षेप घेत खासदार रजनी पाटील यांनी तांत्रिक आणि भौगोलिकदृष्ट्या लातूर-अंबाजोगाई-केज-बीड-जामखेड हा मार्गच अधिक योग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांना कळवले आहे. या मार्गामुळे बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येला थेट दळणवळणाची सोय उपलब्ध होणार आहे.

हा मार्ग अंबाजोगाई आणि केज परिसरातून गेल्यास येथील कृषी, व्यापारी आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. जर नियोजित मार्गात बदल केला तर अपेक्षित लाभ कमी होण्याची शक्यता खासदार पाटील यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण हिताचा विचार करून आणि सार्वजनिक गरजा लक्षात घेता नियोजित मार्ग कायम ठेवावा अशी विनंती त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर अनुकूल निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts