Breaking
WhatsApp Group
Join Now
रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखले
बीड – शेती असूनही ती पिकत नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या युवकांनी गेल्या दशकापासून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावात रोजगार उपलब्ध केला. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल २६० शेतकऱ्यांनी शासनाच्या आर्थिक मदतीतून तुतीची लागवड करत शेड उभारले. बारमाही पीक देणाऱ्या या तुतीपासून शेकडो कुटुंबे समृध्द झाली. परगावात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी गावातच अनेकांनी रोजगार मिळवून दिला. गाव समृध्द करण्याबरोबर स्वच्छ केल्याने १० लाखांचा आर.आर. आबा स्वच्छता पुरस्कारही गावाला मिळाला आहे.
गेवराई तालुक्यातील सिरसदेवी हे गाव भिल्लखोरी तांडा, गायचारी तांडा आणि बॉलेरी तांडा असे मिळून ग्रुप ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथील सरपंच रवींद्र गाडे यांनी २०१७ मध्ये गावात विविध विकासाची कामे राबवली. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांच्या पत्नी सुरेखा रवींद्र गाडे यांना ग्रामस्थांनी निवडून दिले. सरपंचपदाचा पूर्वीचा अनुभव असल्याने रवींद्र गाडे यांनी गावात विविध विकासकामे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन राबवली. हे गाव २०१७ मध्ये पोकरा योजनेत होते. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकोप्यामुळे आज गाव समृध्द बनले आहे.
विभागीय आयुक्त, जि. प. सीईओंची भेट तालुक्यात नंबर एक ग्रामपंचायत कार्यालय बांधल्याने आणि गावात विविध विकास राबवल्याने तत्कालीन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी भेट दिली होती. गावात उत्कृष्ठ घनकचरा व्यवस्थापन केल्याने आणि घंटा गाडीसह प्रत्येक घरासाठी कचरा कुंडी दिल्याने या कामाची पाहणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांनी केली होती.
Last Updated: June 20, 2025