Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अल्पवयीन बालविवाह रोखला; पोलिसांच्या धाडीमुळे नवरदेवासह वऱ्हाड्यांची पळताभुई

Updated: फेब्रुवारी 6, 2026

By Vivek Sindhu

अल्पवयीन बालविवाह रोखला; पोलिसांच्या धाडीमुळे नवरदेवासह वऱ्हाड्यांची पळताभुई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड तालुक्यातील कपिलधार येथे गुरुवारी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने रोखला. ही मुलगी दहावीत ८५ टक्के गुण मिळवून सध्या विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहे. विवाह सोहळा रंगात आलेला असतानाच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे पथक तिथे पोहोचले. गणवेशातील पोलिसांना पाहताच नवरदेव, त्याचे नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळींनी अक्षता टाकण्याऐवजी मंडपातून धूम ठोकली.

या विवाहामागे सुरक्षेची चिंता हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्यामुळे दहशतीचे वातावरण होते. आपल्या मुलीलाही कोणीतरी त्रास देत असून तिच्यासोबतही अनुचित प्रकार घडू शकतो, या भीतीने मुलीच्या आईने तिचे लग्न उरकून घेण्याचा निर्णय घेतला होता. कुटुंबातील प्रमुख म्हणजेच वडील बेरोजगार असल्याने असुरक्षिततेच्या भावनेने या निर्णयाला खतपाणी घातले.

सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला या विवाहाची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीला ताब्यात घेतले. या घटनेमुळे कपिलधार देवस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवरयात सापडले आहे. येथे यापूर्वीही बालविवाह रोखले गेले असून, वयाचा पुरावा न तपासता विवाहास परवानगी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरी देवस्थान समितीची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. बीड पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत.


Categories

Recent Posts