Breaking
Updated: सप्टेंबर 2, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला निर्णायक वळण लागले आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीने अखेर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले असून, या संदर्भात तातडीने शासन आदेश (जीआर) काढण्याची तयारी सुरू आहे.
सरकारने जरांगेंना स्पष्ट केले आहे की हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी तातडीने केली जाईल. यानुसार गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांच्या चौकशीवरून त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे मराठा समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळेल.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगेंना सातारा गॅझेट लागू करण्याची ग्वाही दिली. मात्र या गॅझेटवर तब्बल ८ लाख हरकती आल्याचे उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून एका महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
मनोज जरांगे यांनी सांगितले, “आम्ही सरकारकडे आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. सरकारने आधीच काही गुन्हे मागे घेतले आहेत. उर्वरित गुन्हे कोर्टातून मागे घेतले जातील. सप्टेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. सरकारने याविषयी आम्हाला लेखी हमी दिली असून, जीआरवर मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.”
सरकारने जाहीर केले की मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या वारसांना १५ कोटींची आर्थिक मदत दिली जाईल. आठवड्याभरात ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार वारसांना सरकारी नोकरी देण्यात येईल.
जरांगेंनी ठामपणे मांडलेली मागणी म्हणजे “मराठा आणि कुणबी एकच” या संदर्भात जीआर काढावा. या मुद्यावर सरकारने ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याचे सांगून १ महिन्याची मुदत मागितली होती. मात्र विखे पाटलांनी आणखी वेळ मागत दोन महिन्यांचा अवधी हवा असल्याचे सांगितले. जरांगेंनी याला मान्यता दिली आहे. या मुदतीनंतर मराठा–कुणबी एकच असल्याचा अंतिम जीआर काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पहिल्यांदाच मराठा उपसमिती आझाद मैदानावर पोहोचून जरांगेंशी थेट चर्चा केली. उपसमितीमध्ये अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे आदींचा समावेश होता. त्यांनी जरांगेंना अंतिम मसुदा सादर केला असून, त्यावर तातडीने जीआर काढण्याचा शब्द दिला आहे.
सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय, सातारा गॅझेटवर जलद हालचाली, गुन्हे मागे घेणे आणि मदतीच्या घोषणांमुळे आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. मनोज जरांगे यांनी देखील हा मसुदा अधिकृतरीत्या मान्य करत गोरगरीब मराठा समाजाचा विजय झाल्याची घोषणा केली आहे.