Breaking

“मराठा आंदोलकांना जाणीवपूर्वक त्रास; आयुक्त साहेब, वेळ बदलेल”

Updated: ऑगस्ट 30, 2025

By Vivek Sindhu

“मराठा आंदोलकांना जाणीवपूर्वक त्रास; आयुक्त साहेब, वेळ बदलेल”

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मनोज जरांगे पाटील यांचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईत दुसऱ्या दिवशी आणखी तीव्र झाले आहे. आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांना महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने तरुण आणि कार्यकर्ते समर्थन देण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र, आंदोलनस्थळी मूलभूत सुविधा नाकारण्यात येत असल्याचा आरोप करत जरांगे यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला आणि थेट मुंबई महानगरपालिका आयुक्तांना इशारा दिला.

“आयुक्त साहेब, वेळ बदलेल”
पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, “मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानक परिसरातील आंदोलकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पाणी बंद केले, बाथरूम बंद केले, दुकाने बंद केली. हे सर्व सरकारच्या आदेशावर केले जात आहे. कारण आज पालिकेत प्रशासकाचे राज्य आहे आणि त्याचा कंट्रोल मुख्यमंत्र्यांकडेच आहे. पण वेळ बदलेलच. आयुक्त साहेब, तुम्ही निवृत्त झाल्यावरही सुट्टी मिळू देणार नाही. गावात आलात तर हिशोब केला जाईल.”

“संयम ठेवा, पण हाल सोसावे लागतील”
आंदोलकांना आवाहन करताना त्यांनी म्हटले, “सरकार हेतुपुरस्सर त्रास देत आहे. जेवण मिळत नाही, पाणी मिळत नाही, बाथरूम बंद केले आहे. पण तुम्ही शांतता ठेवा. तुमचे हाल होत आहेत, ते थोडे सहन करा. संयम सोडू नका. आंदोलन शिस्तीत ठेवा.”

पोलिसांनाही इशारा
जरांगे पाटील यांनी पोलिसांनाही थेट इशारा दिला. “पोलिसांनी मुलांना विनाकारण डिवचू नका. ताण देऊ नका. आम्हालाही वेळ येईल. तेव्हा गोष्टी आपल्याप्रमाणे घडवून आणू,” असे ते म्हणाले.

सरकारसमोर वाढता दबाव
मराठा आंदोलनामुळे मुंबईतील आझाद मैदान आणि त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. हजारो आंदोलक ठाण मांडून बसले असून, वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. सरकारने जरांगे यांना फक्त एक दिवसाची परवानगी दिली होती, पण त्यांनी स्पष्ट केले की “आरक्षण मिळाल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही.”

दरम्यान, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे यांच्या या तीव्र वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापले आहे. बीएमसी आयुक्तांना दिलेला थेट इशारा आणि सरकारवर केलेला आरोप लक्षवेधी ठरत आहे. आता सरकार आंदोलन हाताळण्यासाठी कोणता मार्ग काढते याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या या निर्णायक लढ्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.


Categories

Recent Posts