Breaking
Updated: सप्टेंबर 16, 2025
नद्यांना पूर, वाहतूक ठप्प ; पिकांचे नुकसान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने नदी, नाल्यांना पूर आले. तर मुख्य रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने पाणी ओसरेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. मांजरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे चार दरवाजे १.२५० मीटरने तर दोन दरवाजे एक मीटरने उघडून २१५७०.१७ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नदी काठच्या जमिनीसह पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याच्या व सिंचनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या धनेगाव येथील मांजरा धरण हे ओव्हरफ्लो झाल्याने १६ ऑगस्टपासून वेळोवेळी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या नदी, नाले वाहत असताना सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाल्याने मांजरा नदी, केजडी नदी, बोभाटी नदी, लेंडी नदीसह इतर नदी, नाल्यांना पूर आले आहेत. धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या सांडव्याचे द्वार क्र.१,३४,६ हे चार दरवाजे १.२५० मीटरने तर द्वार क्र. २,५ हे दोन दरवाजे १ मीटरने उघडून मांजरा नदी पात्रात २१५७०.१७ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील लेंडी नदीला आलेल्या पुराने पुलावरून पाणी वाहू लागल्याने केज – नांदूरघाट रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील केवड, वरपगाव, बोरगाव, नाव्होली, शिरूर घाट, नांदूरघाट या गावाकडून केजला येणाऱ्या नागरिकांना पाणी ओसरण्याची वाट पहावी लागली. केज – विडा रस्त्यावरील कानडी माळी येथील नदीला पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
तर मस्साजोग ते बोरगाव या रस्त्यावर आरणगावजवळ बोभाटी नदीला पूर आल्याने आरणगाव, काळेगावघाट, उत्तरेश्वर पिंप्री येथील नागरिकांची रहदारी बंद झाली होती. त्याचबरोबर केळगाव – बेलगाव रस्त्यावरील नदीला पूर आल्याने या दोन्ही गावांची वाहतूक ठप्प झाली होती. केजडी नदीला पूर आल्याने सोनीजवळा व गांजी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
जोरदार पावसाने नदी, नाल्यांना पूर आल्याने नदी काठच्या जमिनीचे व पीकांचे नुकसान झाले असून शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव, सारणी (सांगवी) या मध्यम प्रकल्पासह लिंबाचीवाडी, जिवाचीवाडी, कासारी, नाव्होली, जाधवजवळा, उंदरी, जानेगाव हे साठवण तलाव भरले असून सोमवारी होळ, मस्साजोग, जानेगाव हे तीन तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.
आता मुलेगाव हा एकमेव तलाव भरण्याच्या मार्गावर असून इतर पाझर तलाव भरले आहेत. दरम्यान, विड्यापासून जवळ असलेल्या गौरवाडी पाझर तलावाला तडे गेले असून तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे भरून वाहू लागली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोठे, मध्यम व लघु तलाव सुद्धा पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर अनेक नद्यांना पूर आला असून गावोगाव नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही गावांचा संपर्क तुटला असून, अनेक ठिकाणी पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पाण्याचा प्रवाह असलेल्या पुलावरून जाण्याचे टाळावे. विजेच्या तारा, खांब यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. पिण्यासाठी स्वच्छ व उकळलेल्या पाण्याचा वापर करावा. कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केले आहे.