Breaking
Updated: ऑक्टोबर 15, 2025
मांजरा धरणातून मंगळवारी विसर्ग बंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – यंदा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झालेल्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणातून १६ ऑगस्टपासून विसर्ग सुरू करण्यात आला होता. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाने कहर केल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला होता. आता पाऊस बंद असून धरणात येणारी आवक कमी झाली आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी १ वाजता उघडे असलेले दोन्ही दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब शहरासह ६१ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या व ६३ गावाच्या सिंचनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या धनेगाव (ता. केज) येथील २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेचे मांजरा धरण हे दरवर्षी परतीच्या पावसावर अवलंबून असते. यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसाने घेतलेल्या ओढमुळे धरणात अपेक्षित पाणी साठा झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्गासह नागरिकांचे आकाशाकडे लागले होते. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने २० दिवसात धरण ओव्हरफ्लो झाले. १६ ऑगष्टपासून धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला. मागील काही दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने धरणात येणारी आवक कमी झाली आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी १ वाजता उघडे असलेले दोन्ही दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी धरणाचे दरवाजे उघडून तब्बल १०३६.१०६ दलघमी इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.