Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पोलिसांची मस्करी पडली महागात; डायल ११२ वर चोरीची खोटी माहिती देणाऱ्याची रवानगी थेट कारागृहात

Updated: फेब्रुवारी 4, 2026

By Vivek Sindhu

पोलिसांची मस्करी पडली महागात; डायल ११२ वर चोरीची खोटी माहिती देणाऱ्याची रवानगी थेट कारागृहात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील एका तरुणाने ‘डायल-११२’ या आपत्कालीन क्रमांकावर चोरीची खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रदोष गंगाधर जाधव या ईसमाला अटक केली असून, त्याला ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केवळ पोलिसांना विनाकारण कामाला लावण्यासाठी आणि त्यांना त्रास देण्यासाठी आपण हा बनाव रचल्याची कबुली आरोपीने दिल्याने खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत त्याची बीड येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

३० जानेवारी २०२६ रोजी रात्री १०:२० च्या सुमारास आरोपी प्रदोष जाधव याने डायल-११२ वर फोन करून मादळमोही येथील ‘बालाजी ट्रेडिंग कंपनी’ मध्ये सोने आणि पैशांची चोरी झाल्याची माहिती दिली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत मादळमोही पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राजभाऊ गर्जे आणि पोलीस हवालदार संजय गुजर यांनी तातडीने आरोपीला फोन करून घटनास्थळाचा पत्ता विचारला. त्यावेळी आरोपीने चोरी झाली नसल्याचे सांगत, केवळ पोलिसांना त्रास व्हावा म्हणून हा खोटी माहिती दिल्याचे मान्य केले. पोलिसांनी घटनास्थळाची शहानिशा केली असता तिथे कोणतीही चोरी झाली नसल्याचे निष्पन्न झाले.

या कृत्याबद्दल पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यावर आरोपीने पुन्हा उद्धटपणा करत पोलीस कर्मचाऱ्यांना फोन केला. ‘तुम्ही माझ्यावर गुन्हा कसा दाखल केला, तुम्ही येथे कशी नोकरी करता तेच बघतो’ अशी धमकी त्याने पोलिसांना दिली. या धमकीनंतर त्याच्यावर अतिरिक्त गुन्हा दाखल करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याला विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्यासमोर हजर केले असता, त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, राजभाऊ गर्जे, विजय परजणे, संजय गुजर आणि शेखर हिंगावार यांच्या पथकाने केली आहे. बीड जिल्हा आणि गेवराई पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, डायल-११२ हा क्रमांक तातडीच्या मदतीसाठी आहे. अशा प्रकारे खोटी माहिती दिल्यास खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे गैरवापर करणाऱ्यांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.


Categories

Recent Posts