Breaking
Updated: फेब्रुवारी 8, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहरातील एका बिअर बारसमोर असलेल्या आडस फाटा परिसरात एका मिस्त्रीला अडवून तिघांनी जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन पैशांची विचारणा केली असता आरोपींनी संगनमत करून मारहाण केली आणि २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख इमरान दस्तगीर (रा. होळ, ता. केज) हे व्यवसायाने मिस्त्री असून कामासाठी अंबाजोगाई परिसरात आले होते. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास इमरान हे आडस फाटा येथील एका बिअर बारसमोर उभे होते. त्यांनी तिथे असलेल्या तीन अनोळखी तरुणांना तुमच्याकडे ऑनलाईन पैसे आहेत का अशी विचारणा केली. याचाच फायदा घेत त्या तीन तरुणांनी इमरान यांना बाजूला नेले आणि त्यांच्याकडे असलेल्या पैशांची मागणी केली.
इमरान यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही मला ऑनलाईन पैसे पाठवा, मी तुम्हाला रोख रक्कम देतो. या गोष्टीचा राग आल्याने त्या तिघांनी संगनमत करून इमरान यांना चापट मारहाण केली. त्यांना धरून ठेवत त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये रोख आणि १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. एकूण २० हजार रुपयांचा ऐवज चोरून आरोपी तिथून पसार झाले.
याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा शेख इमरान दस्तगीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन अज्ञात आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.