Breaking
Updated: ऑक्टोबर 29, 2025
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: राहुल गांधींनी कुटुंबीयांशी साधला फोनवरून संवाद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelफलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे कुटुंबीयांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित कुटुंबीयांचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले.
यावेळी राहुल गांधी यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबियांकडून मराठीत ऐकून घेतली. कुटुंबाची बाजू समजून घेतल्यानंतर राहुल गांधींनी, ‘तुम्हाला आता काय हवे आहे?’ असे विचारले. त्यावर कुटुंबियांनी अत्यंत भावनिक होऊन दोन प्रमुख मागण्या केल्या: या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी व्हावी आणि दोषी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. राहुल गांधी यांनी कुटुंबियांना काळजी न करण्याचे सांगत, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ असे आश्वासन दिले.
महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यातील एका होतकरू डॉक्टरवर आलेल्या या आपत्तीमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना भावनिक आधार दिला आणि या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.