Breaking
Updated: ऑक्टोबर 13, 2025
महाराष्ट्रातील पहिली मायक्रो ओबीसी, अलुतेदार, बलुतेदार चिंतन परिषद अंबाजोगाईत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमायक्रो ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आमदार संजय केनेकरांचा एल्गार; ‘इतिहासात आमचा सहभाग, पण नाव नाही’ म्हणत मांडली व्यथा
अंबाजोगाई – “छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईत आणि प्रत्येक सामाजिक कार्यात आमचा सहभाग होता, पण इतिहासाने आमची दखल घेतली नाही. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगतो, पण आज आमचा मायक्रो ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार समाज उपेक्षित आणि शोषित आहे,” अशा शब्दांत भाजपचे विधानपरिषद आमदार संजय केनेकर यांनी समाजाची व्यथा मांडत हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले.
अंबाजोगाई येथील नगरपालिका सभागृहात अखिल भारतीय बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेच्या वतीने आयोजित चिंतन परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत गाडगेबाबा यांचे वंशज प्रवीण जानोरकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात आमदार केनेकर यांनी मायक्रो ओबीसी समाजाच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “सगळ्या समाजाचे आणि शोषितांचे महामानव हे आमचे आहेत, पण आज आमची ओळखच पुसली जात आहे. खंडाळ्यात गोरक्षकांवर हल्ला होतो, पण फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेणारे नेते पुढे येत नाहीत. ते फक्त मतांसाठी या महापुरुषांची नावे वापरतात.”
“पंतप्रधान मोदींनी माझ्या मागणीचा मान ठेवला”
राज्यातील मायक्रो ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आपण सातत्याने लढत असल्याचे सांगताना केनेकर यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असताना मी प्रोटोकॉल तोडून त्यांच्याजवळ गेलो आणि मायक्रो ओबीसी समाजाच्या व्यथा मांडल्या. पंतप्रधानांनी माझ्या मागणीचा आदर करत आपल्या भाषणात ‘मायक्रो ओबीसी’चा उल्लेख केला. हा आमच्यासाठी मोठा क्षण होता.”
राजकीय पक्षांना आव्हान आणि समाजाला साद
आमदार केनेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आव्हान देत म्हटले की, “आमची जागा दाखवा. आम्ही महाराष्ट्रात संख्येने कमी असलो तरी प्रत्येक ठिकाणी विखुरलेलो आहोत. सत्ता स्पर्धेच्या खेळात आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.” त्यांनी रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आपण पक्षाकडे आग्रही असल्याचेही स्पष्ट केले.
समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “हा समाज पेटवा, त्याला लढण्याच्या प्रवाहात आणा. माझ्या मायक्रो ओबीसी समाजातील लोकांना कुठल्या ना कुठल्या महामंडळावर संधी मिळेल, हा माझा शब्द आहे. आम्ही केवळ संघर्ष करणारे नाही, तर राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आमच्यात आहे.”
या चिंतन परिषदेचे आयोजन अखिल भारतीय बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेने केले होते. या परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या विविध मागण्या आणि पुढील संघर्षाची दिशा ठरवण्यात आली.