Breaking

महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस

Updated: ऑगस्ट 18, 2025

By Vivek Sindhu

महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मुंबई – मागील काही दिवसांपासून दडी धरून बसलेला पाऊस अखेर आत्ता महाराष्ट्रात परतला आहे. आज सोमवारी पहाटेपासूनच मुंबईसह सर्वदूर महाराष्ट्रात पावसाच्या जोरधारा कोसळत आहेत. परिणामी, राज्याच्या आर्थिक राजधानीतील सखल भागांत पाणी साचल्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मराठवाड्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 3, बीड जिल्ह्यातील 2 व हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे पावसामुळे बिकट स्थिती निर्माण झाल्यामुळे तिथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पुण्यातूनही 20 जणांचे एक पथक मागवण्यात आले आहे. एनडीआरएफचे एक पथक बीडमध्ये मदतकार्य करत आहे. तर एसडीआरफची 2 पथकने नांदेडमध्ये कार्यरत आहेत. मराठवाड्यातील 57 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सरकारने स्थानिक प्रशासनाचा स्थिती पाहून शाळांना सुट्टी देण्याची सूचना केली आहे.

पुढील 3-4 तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.वादळी वारे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईसह महाराष्ट्रातील पाऊसमानाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आज सोमवारी सायंकाळी 6 वाजेनंतर समुद्रात किमान 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आज सायंकाळी सहा-साडेसहानंतर समुद्रात किमान तीन मीटरच्या लाटा उसळतील. त्यानंतर उद्या चार मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. सध्या भरतीचा काळ आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस असेल. त्यामुळे समुद्राची आणि नाल्यांची पातळी सारखी असेल. आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावे लागेल. याची व्यवस्था मुंबई पालिकेने तयार केली आहे. लोकांनी काळजी घ्यावी. लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात, असे म्हणत त्यांनी नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.


Categories

Recent Posts