Breaking

महादेव मुंडेच्या कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न

Updated: July 17, 2025

By Vivek Sindhu

महादेव मुंडेच्या कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीड SP कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, विषही प्राशन केले

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज सकाळी बीड स्थित पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न करून एकच खळबळ उडवून दिली. या सर्वांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे व पोलिसांत काहीशी झटापटही झाली. दरम्यान, पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परळी येथील व्यापारी मुंडे यांची ऑक्टोबर 2023 मध्ये निर्घृण हत्या झाली होती. या घटनेला आजमितीस 18 महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक झालेला वाल्मीक कराड हाच या हत्येमागे असल्याचा आरोप केला जात आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही वारंवार हा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी अनेकदा बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. पण पोलिस तपास पुढे सरकला नाही. याला कंटाळून आज त्यांनी आपल्या कुटुंबासह बीड पोलिस अधीक्षक कार्यालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह त्यांचे आई-वडील व मुले पोलिसांच्या वेळकाढू धोरणाविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांच्यात यावेळी काहीशी झटापटही झाली. पण पोलिसांनी वेळीच त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या हिसकावून घेतल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकारानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

माध्यमांशी संवाद साधताना विष प्राशन

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अचानक विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. ज्ञानेश्वरी मुंडे यांचे बंधू सतीश फड यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, आज माझ्या बहिणीचा संयम सुटला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा मांडला पाहिजे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणावर आज पोलिस अधीक्षकांशी चर्चा झाली. त्यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेला वर्ग केला आहे. आता आरोपींच्या अटकेसाटी पथक पाठवण्यात येणार होते. पण माझ्या बहिमीचा संयम सुटला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असे ते म्हणाले.

पीडितांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरठे झिजवावे लागणे दुर्दैवी – सुप्रिया सुळे

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, महादेव मुंडे हत्या प्रकरणाला दीड वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण त्यानंतरही एकाही मारेकऱ्यास अटक करण्यात आली नाही. मुंडे कुटुंबीयांनी तपासात दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला. खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरठे झिजवावे लागतात व शेवटी हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शासनाने या प्रकरणी पीडित कुटुंबाशी संवाद साधून योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.

जितेंद्र आव्हाड यांनीही व्यक्त केला संताप

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या नवर्‍याची ज्यांनी हत्या केली, त्यांना अटक करावी, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना एक भगिनी न्यायासाठी लढा देत असताना न्याय मिळेल, अशी आशा संपल्याने आत्महत्येचा प्रयत्न करीत असेल तर ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, असे ते म्हणालेत.