Breaking
Updated: फेब्रुवारी 28, 2026
स्थानिक गुन्हे शाखेने सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : जुन्या डिघोळ अंबा रोडवर एका सोनाराला अडवून, त्यांच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून आणि शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी एक व्यावसायिक सोनार आपले दागिने विक्री करण्यासाठी मोटारसायकलवरून जुन्या डिघोळ अंबा रोडने जात होते. होळ ते डिघोळअंबा दरम्यान असलेल्या दर्गाजवळ दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडवले. दरोडेखोरांनी सोनाराच्या डोळ्यात तिखट चटणी टाकली आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी बळजबरीने हिसकावून आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. अंबाजोगाई बसस्थानक परिसरात संशयित रोहित रंजीत धिमधिमे हा उभा असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सुदाम गणपत सोनवणे (रा. डिघोळअंबा, ता. धारूर) आणि पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार वीरसिंग रिसपालसिंग टाक (रा. अंबाजोगाई) यांच्या सांगण्यावरून इतर साथीदारांसह हा दरोडा टाकल्याचे कबूल केले.
या कारवाईत पोलिसांनी अभिषेक अशोक घाटुळ (रा. कन्हेवाडी, ता. परळी), कानिफनाथ विलास डुरकर (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) आणि यशोदीप कल्याण किर्दन (रा. सातेफळ, ता. अंबाजोगाई) या इतर आरोपींनाही अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल, सहा मोबाईल आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी युसुफ वडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गिते, मारुती कांबळे, दीपक खांडेकर, गणेश मराडे आणि विकी सुरवसे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.