Breaking

लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनची फेलोशिप प्राप्त डॉ.आरीफ अली उस्मानी यांचा सत्कार

Updated: सप्टेंबर 27, 2025

By Vivek Sindhu

डॉ.आरीफ यांच्यासारख्या अभ्यासू डॉक्टरांची भारताला गरज - डॉ.सुरेश खुरसाळे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

डॉ.आरीफ यांच्यासारख्या अभ्यासू डॉक्टरांची भारताला गरज – डॉ.सुरेश खुरसाळे

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- डॉ.आरीफ अली उस्मानी यांच्यासारख्या अभ्यासू व तज्ज्ञ डॉक्टरांची भारताला गरज आहे, त्यामुळे त्यांनी भारतात राहून सेवा करावी आणि वैद्यकीय सेवेचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा डॉ.सुरेश खुरसाळे यांनी व्यक्त केली. तर जो पर्यंत आपण आपली माती, आपला देश सोडून परदेशात जात नाहीत. तो पर्यंत त्या मातीचं, मातृभुमीचं महत्व आपल्याला कळत नाही असे भावोद्गार डॉ.आरीफ अली उस्मानी यांनी काढले. नुकतेच लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनची फेलोशिप प्राप्त केल्याबद्दल डॉ.आरीफ यांचा ह्रद्य सत्कार अंबाजोगाईत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

अंबाजोगाईचे भुमिपुत्र डॉ.आरीफ अली उस्मानी यांनी लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनची फेलोशिप मिळवून डब्लिन, आयर्लंड, ग्रेट ब्रिटन या विश्व प्रसिद्ध संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएट एम.डीची डिग्री प्राप्त केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात ही खूप मोठी उपलब्धी मानली जाते. युरोप मधील एक प्राचीन व आदरयुक्त वैद्यकीय संस्था असून ती जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आहे. जगभरातील डॉक्टर्स या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल असतात. डॉ.आरीफ हे मराठवाड्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ मीर फरकुंद अली उस्मानी यांचे सुपुत्र आहेत. तसेच ते श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. ते सध्या सौदी अरेबिया येथे वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.‌ त्यांना फेलोशिप मिळाल्यामुळे अंबाजोगाई येथील हॉटेल इट ऍण्ड स्टे मध्ये गुरूवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेश खुरसाळे (माजी अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्था) तर प्रमुख अतिथि म्हणून जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, डॉ.शंकरराव धपाटे (अधिष्ठाता, स्वा.रा.ती.शा.रू व ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई), राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई), ज्येष्ठ विधीज्ञ मीर फरकुंद अली उस्मानी, पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा), डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबाजोगाई येथील डॉ.राहुल धाकडे व मुजीब काझी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी आमदार साठे म्हणाले की, डॉ.आरीफ हे अंबाजोगाई शहराची शान आहे. याचा सर्व अंबाजोगाईकरांना गर्व आहे. यावेळी राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहरातील उस्मानी घराणे हे उच्चशिक्षित, सामाजिक बांधिलकी जपणारे घराणे असून या घराण्याने शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात फेलोशिप मिळणे ही सोपी गोष्ट नाही. तर डॉ.आरीफ यांनी सौदी येथे जाऊन जी फेलोशिप मिळविलेली आहे. याचा आम्हां सर्वांना एक अंबाजोगाईकर म्हणून रास्त अभिमान आहे. डॉ.धाकडे व काझी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून युवकांना प्रोत्साहन दिले आहे असे मोदी म्हणाले. तर यावेळी डॉ.बिराजदार म्हणाले की, आपल्याच माणसाने आपल्या माणसाचा सत्कार करणे ही अभिनंदनीय गोष्ट आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अंबाजोगाई येथील लोक एकमेकांवर प्रेम करतात. स्वा.रा.ती.रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय उभारणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे कै.डॉ.व्यंकटराव डावळे हे अंबाजोगाई शहरातील पहिले वैद्यकीय क्षेत्रात फेलोशिप मिळालेले व्यक्तिमत्व असून त्यानंतर डॉ.आरीफ अली उस्मानी हे दुसरे डॉक्टर आहेत. की, ज्यांनी फेलोशिप मिळविली आहे. या वेळी बोलताना अधिष्ठाता डॉ.धपाटे म्हणाले की, भविष्यात डॉ.आरीफ यांचा अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेजला ही फायदा होईल. वाढत्या मेडिकल कॉलेजमुळे भविष्यात डॉक्टर बाहेर पाठवावे लागणार आहेत. त्या वेळेस ही त्यांचा फायदा होईल. सत्काराला उत्तर देताना डॉ.आरीफ म्हणाले की, अंबाजोगाई शहरातील सर्वच जाती धर्मातील लोकांनी आमच्या संपूर्ण कुटुंबावर जीवापाड प्रेम केलेले असून हे ऋण आम्ही कदापिही विसरू शकत नाहीत. मला जे संस्कार मिळाले ते योगेश्वरी संस्थेमधूनच मिळाले आहेत. प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळेच एक जिद्द उराशी बाळगून फेलोशिप मिळविण्यासाठी मी अथक परिश्रम घेतले, यासाठी अनेकांचे सहकार्य व आशिर्वाद ही लाभले. आज या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने अंबाजोगाईकरांनी जे प्रेम दाखविले आहे. त्यामुळे मी भारावलो आहे. यापुढे माझ्याकडून जे वैद्यकीय सेवेचे काम होईल, ते काम माझ्या गावची माती समोर ठेऊनच होईल असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.खुरसाळे म्हणाले की, आज समाजात विदारक परस्थिती निर्माण झाली आहे. वैद्यकीय सेवेमधून सेवाभाव राहिलेला नाही, हे कटू सत्य आहे. ज्याच्या खिशात पैसे आहेत. त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा आहे. समाजासाठी ही मोठी नामुश्किची गोष्ट आहे. पैसे असले तरी चांगली वैद्यकीय सेवा मिळेलच याची खात्री नाही. अशा डॉक्टरांनी हा त्यांच्यावरचा कलंक समजला पाहिजे. तळागाळातील व्यक्तीला सुद्धा आश्वासक पद्धतीने योग्य उपचार मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. यापुढे ही सेवा कार्पोरेटच्या हाती जाणार आहे. हा धोका वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हान समजलं पाहिजे आणि होतकरू डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारलं पाहिजे. डॉ.आरीफ यांना सल्ला देताना ते म्हणाले शिकण्यासाठी आपण जरूर विदेशात जा मात्र आपली गरज भारतात आहे, या मातीला आहे. त्या ठिकाणी पैसा मिळविणे आपणांस आव्हान नाही. मात्र भारतात राहून आपण सेवा करावी वैद्यकीय सेवेचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करावा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राहुल धाकडे यांनी केले तर सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मुजीब काझी यांनी मानले. या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts