मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला प्रमाणपत्र वितरण सोहळा
केज – केजच्या जेष्ठ नागरिक संघाला नुकतीच ‘फेडरेशन ऑफ सिनिअर सिटीजन्स ऑफ महाराष्ट्र’ अर्थात ‘फेसकॉम्’ यांचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले असून याचे रीतसर प्रमाणपत्र वितरण एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले.
केज येथे जेष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिकांच्या बदलत्या आयुष्यात अनेक कौटुंबिक, सामाजिक व प्रशासकीय अडचणी येतात. ज्यांनी आपल्या महत्वाच्या आयुष्यात क्रियाशील राहून कुटुंब, समाज व देशासाठी मोठे कार्य केलेले असते. असे लोक साठी ओलांडल्यानंतर चोहीकडून बेदखल होतात. अशा वेळी संघटनेच्या रूपाने त्यांना एक – दुसऱ्याचा आधार बनून अशा अडचणी सोडवता याव्यात. एकत्र येऊन उर्वरीत आयुष्यात आनंद घेता यावा, या उद्देशाने जेष्ठ नागरिक संघ कार्यरत आहे.
या संघाचे फेसकॉम् अंतर्गत अधिकृत मान्यता प्रमाणपत्र केजच्या संघाला संघाचे केज शाखाध्यक्ष ऍड. राजेसाहेब देशमुख व सचिव जी. बी. गदळे यांच्याकडे फेसकॉम् मराठवाडा दक्षिण विभागीय अध्यक्ष डॉ. डी. एच. थोरात व सचिव जगदीश जाजू यांच्या वतीने सोपवण्यात आले. डॉ डी. एच. थोरात यांनी संघाच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तर सचिव जगदीश जाजू यांनी संघाच्या तांत्रिक नियम व उपक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी अंबाजोगाई जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष कुंडलिक पवार, विद्यमान अध्यक्ष ऍड. अनंतराव जगतकर, ऍड. राजेसाहेब देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष व केज संघाचे कोषाध्यक्ष रामेश्वर जाजू यांनी आपले विचार मांडले.
यावेळी मे-जूनमध्ये वाढदिवस असणाऱ्या केज जेष्ठ नागरिक संघाच्या बारा सदस्यांचे वाढदिवस शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. एस. साखरे यांनी, सुत्रसंचालन हनुमंत भोसले यांनी तर आभार माजी प्राचार्य लक्ष्मण जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला सत्तरहून अधिक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.