Breaking
Updated: सप्टेंबर 5, 2025
मोरपीस टोपी घातलेले वासुदेव ठरले आकर्षण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमोरपीस टोपी घातलेले वासुदेव ठरले आकर्षण
केज – केज शहरातील सराफ लाईन भागातील सुवर्णकार गणेश मंडळाने डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेश मूर्तीची रथातून मिरवणूक काढून लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर मोरपीस टोपी घातलेल्या “”वासुदेव”” हे लोककलाकार मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
केज शहरातील सराफ लाईन भागात सराफ व्यापाऱ्यांनी सुवर्णकार गणेश मंडळाची स्थापना केली असून हे मंडळ दरवर्षी गणेश मूर्तीची स्थापना करते. तर गुरुवारी दुपारी विसर्जनाची तयारी करीत मिरवणुकीसाठी डीजे, डॉल्बी या कर्णकर्कश आवाजाच्या वाद्याला फाटा देत पारंपरिक वाद्य लावले होते.
या गणेश मंडळाने गणेश मूर्ती रथात ठेवून मिरवणुकीला सुरुवात केली. तर मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी व सदस्य हे अंगात पांढरे शुभ्र नेहरू शर्ट, पॅन्ट व गळ्यात लाल गमजा घालून सहभागी झाले होते. तर गणेश मूर्ती असलेल्या रथाच्या पुढे डोक्यावर मोरपीसची टोपी असलेले “” वासुदेव”” हे लोककलाकार टाळ वाजवत “”वासुदेव आला रे वासुदेव”” असे भजन करीत लक्ष वेधून घेतले.
शहरातील मंगळवार पेठ, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मुख्य रस्त्यावरून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली. मिरवणुकीत ठिकठिकाणी तोफांची सलामी देत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. “”गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”” जयघोष करीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, या मंडळाने डीजे मुक्त मिरवणूक काढून इतर गणेश मंडळापुढे आदर्श ठेवला आहे.
सुवर्णकार गणेश मंडळाने लेझीम आणि वासुदेव या कला आता काळाच्या ओघात लुप्त होत असताना श्री गणेशाच्या मिरवणुकीत त्याचा खुबीने वापर करून शहरवासीयांना त्याचा आनंद घेण्यासाठी संधी दिली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री विसर्जन मिरणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन टाळण्यात यावे अशा सूचना पोलिस प्रशासनाने सर्व गणेश मंडळ आणि गणेश भक्तांना दिल्या आहेत. नियमांचे व अटींचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे देखील सूचना दिल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन सुवर्णकार गणेश मंडळाने केले.