Breaking

केजमधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; आंटी अटकेत, पिडीतेची सुटका

Updated: सप्टेंबर 30, 2025

By Vivek Sindhu

केजमधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; आंटी अटकेत, पिडीतेची सुटका

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पथकाने सोमवारी सायंकाळी केज शहरातील गणेश नगर परिसरातील एका कुंटखान्यावर छापा टाकून एका आंटीला ताब्यात घेत एका पिडीतेची सुटका केली. यावेळी पैसे व साहित्य जप्त करण्यात आले असून प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पल्लवी भाऊसाहेब जाधव (पीएसआय, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, बीड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश नगर, उमरी रोड येथील वर्षा चंद्रकांत कवचट (वय ५०) ही महिला तिच्या घरी आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून पुरुष गिऱ्हाईकांकडून पैसे घेऊन वेश्याव्यवसाय चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीवरून पोलीस निरीक्षक स्वप्नील कचरू उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून दोन पंच व डमी ग्राहकांची नेमणूक करण्यात आली. डमी ग्राहकास ५०० रुपयांच्या तीन नोटा (एकूण १५०० रुपये) देण्यात आल्या. त्यानंतर सायं. ५ वाजता पथकाने छापा टाकला.

छाप्यात वर्षा कवचट हिच्याकडे पंचासमक्ष डमी ग्राहकास दिलेल्या १५०० रुपयांच्या नोटा मिळून आल्या. घरातील दुसऱ्या खोलीत ३२ वर्षीय पिडीतेला ताब्यात घेण्यात आले. तिच्या जबाबात ती वर्षा कवचट हिच्यासाठी वेश्याव्यवसाय करीत असल्याचे व प्रत्येक ग्राहकामागे १५०० रुपये घेतले जात असून त्यातील ५०० रुपये तिला देण्यात येतात, उर्वरित १००० रुपये वर्षा कवचट ठेवते असे सांगितले.

झडतीदरम्यान पंचासमक्ष १५०० रुपये रोख रक्कम व १५ निरोध जप्त करण्यात आले.

प्रकरणी आरोपी वर्षा चंद्रकांत कवचट हिच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पथकात पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पीएसआय पल्लवी जाधव, पोलीस कर्मचारी अहंकारे, मुंडे, मिरा रेडेकर, प्रदीप येवले, अशोक शिंदे, योगेश निर्धार तसेच दोन पंच यांचा समावेश होता.


Categories

Recent Posts