Breaking

केज मतदार संघात ३० ‘स्मार्ट अंगणवाडी’ प्रकल्पांना मंजुरी; आ. नमिता मुंदडा यांचे यशस्वी प्रयत्न

Updated: ऑक्टोबर 29, 2025

By Vivek Sindhu

केज मतदार संघात ३० ‘स्मार्ट अंगणवाडी’ प्रकल्पांना मंजुरी; आ. नमिता मुंदडा यांचे यशस्वी प्रयत्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघासह राज्यभरातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीला अखेर मंजुरी दिली आहे. दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केज मतदार संघातील ३० स्मार्ट अंगणवाडी किटसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निर्णयासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंडडा यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनदरबारी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केज व अंबाजोगाई तालुक्यातील तीस अंगणवाड्यांना याचा थेट लाभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत केज मतदार संघातील चिचखंडी, सोमनाथ बोरगाव, ममदापूर (पाटोदा), मोरेवाडी क्र.१इ, जोगाईवाडी क्र.१, धानोरा खु., लोखंडी सावरगाव क्र.१, लोखंडी सावरगाव क्र.२, लोखंडी सावरगाव क्र.३, धनेगाव, सौन्दना, पिसेगाव् (१), पिसेगाव (२), वाघेबाभूळगाव, भाटुंबा, केकतसारणी, पिंपळगव्हाण, नाव्होली, उत्तरेश्वर पिंपरी, सातेफळ, आंधळेवाडी (१), आंधळेवाडी (२), पैठण, बोरी सावरगाव, लाडेवडगाव, कोल्हेवाडी, कासारी, उमरी क्र.१, काळेगाव घाट क्र.१ आणि माळेगाव क्र.२ या अंगणवाड्यांना अत्याधुनिक उपकरणे, शिक्षणसामग्री, आरोग्य व पोषणविषयक साधने, तसेच कौशल्यविकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रती कीटची किंमत १ लाख ६४ हजार ५६० असून हा प्रकल्प २०२५-२६ आर्थिक वर्षात राबविण्यात येईल. अंगणवाडींना आधुनिक स्वरूप देऊन बालकांना आनंददायी वातावरणात प्राथमिक शिक्षण, पोषण, आरोग्यसेवा आणि मातांसाठी कौशल्यविकास उपक्रम देण्याचा उद्देश या योजनामागे आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील बालविकास सेवांना नवे तांत्रिक रूप मिळणार आहे.

आमदार नमिता मुंदडा यांनी सांगितले की, “केज व अंबाजोगाई तालुक्यातील अंगणवाड्यांचे रूपांतर ‘स्मार्ट’ स्वरूपात करण्यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा केला. शासनाने मंजुरी दिल्याने महिलांच्या आणि बालकांच्या विकासाला नवा आयाम मिळेल.” या मंजुरीनंतर केज आणि अंबाजोगाईतील सर्व प्रकल्प अधिकारी व बालविकास विभागाने अंमलबजावणीसाठी तयारी सुरू केली असून, पुढील काही महिन्यांत ‘स्मार्ट अंगणवाडी’ प्रत्यक्षात सुरू होतील. हा निर्णय केज-अंबाजोगाई तालुक्यांच्या ग्रामीण विकास, बालसंवर्धन आणि महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या निर्णयाबद्दल आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.


Categories

Recent Posts