Breaking

केजमध्ये कोरडेवाडीच्या ग्रामस्थांचा साडेचार तास रास्ता रोको ; दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Updated: ऑक्टोबर 14, 2025

By Vivek Sindhu

पाच बसवर दगडफेक : पाच प्रवाशी जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाच बसवर दगडफेक : पाच प्रवाशी जखमी

केज – कोरडेवाडी येथील साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत व संपूर्ण कर्जमाफी करावी, ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत देण्यात यावा या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. १४) दुपारी १२ वाजता मोर्चा काढून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल साडेचार तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात बाळराजे आवरेंनी पेट्रोल अंगावर ओतून तर स्वप्नील वरपेंनी विषारी औषध प्राशन करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर अज्ञातांनी बसवर दगडफेक केल्याने पाच बसचे काचा फुटून नुकसान झाले. तर बसमधील चालक, वाहकांसह पाच प्रवाशी जखमी झाले.
छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री उमरे यांनी मागील बारा दिवसांपासून या मागण्यासाठी उपोषण सुरू केले असताना शासनाकडून मागण्यासंदर्भात दखल घेतली नसल्यावरून ८ ऑक्टोबर रोजी संतप्त आंदोलकांनी शासकीय विश्रामगृह येथून बैलगाडी मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर पेट्रोल टाकून बैलगाडी पेटविली. तर काही आंदोलनकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहणाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी आंदोलक व गावकऱ्यांनी टोकवाडी रस्त्यावरील तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले. या दोन आंदोलनानंतर ही शासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने गावकरी आक्रमक बनले होते.
मंगळवारी सकाळी ११.३० वाजता आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी मुलाबाळांसह केजला मोर्चा काढला. दुपारी १२.३० वाजता धारूर चौकातून मोर्चाला सुरुवात करीत “”पाणी आमच्या हक्काचं, देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व कर्जमाफी मिळाली पाहिजे”” अशा घोषणा देत अहिल्यानगर – अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी पावणे एक वाजता रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनकर्त्यांनी आपल्या भाषणातून खासदार, आमदारांसह सरकारवर टीकेची झोड उठवून तब्बल साडेचार तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात बाळराजे आवरेंनी पेट्रोल अंगावर ओतून तर स्वप्नील वरपेंनी विषारी औषध प्राशन करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
आंदोलन सुरू असताना अज्ञातांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या लातूर – पाटोदा (एम. एच. १४ एमएच १५५९), अहमदपूर – चाळीसगाव (एम. एच. १४ एमएच ६५२२), उदगीर – गंगापूर (एम. एच. १४ एमएच ८९३८), गंगाखेड – आळंदी (एम. एच. १४ बीटी ३९६४), (एम. एच. २० बीएल २१०८) या बसच्या समोरील काचावर दगडफेक करण्यात आल्याने बसचे नुकसान झाले आहे. तर बसमधील चालक, वाहकांसह पाच प्रवाशी जखमी झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही बस या बसस्थानकात उभ्या केल्याने बसस्थानक बसने गच्च भरले होते.

दरम्यान, शहरात आलेली वाहने रास्ता रोकोमुळे रस्त्यावर थांबून राहिल्याने दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर अंबाजोगाई, बीड, पुणे, कळंब, धारूर रस्त्यावरील वाहतूक चार तास ठप्प राहिल्याने प्रवाशी नागरिक – महिला अडकून पडले होते. तर प्रवाशांची उपासमार झाली.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ; आंदोलक तहसीलमध्ये ठाण मांडून

उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी आंदोलकांना रास्ता रोको मागे घ्यायला लावून तहसील कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी राज्यांच्या सचिवांशी चर्चा घडवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र आताच तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र द्यावे, असा आग्रह धरीत तहसील कार्यालयात आंदोलक ठाण मांडून होते.


Categories

Recent Posts