बीड : एका कार अपघातानंतर पोलिसांनी तपासणी केली असता अपघातग्रस्त कारमधून तब्बल १०५ किलो गांजा सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या गांजाची किंमत तब्बल २१ लाख १५ हजार रुपये इतकी असून पोलिसांनी दोन जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
माहितीनुसार, पाटोदा येथील एका घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांची टीम २६ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना भरधाव वेगाने जाणारी मारुती सुझुकी सियाज गाडी संशयास्पद वाटली. काही वेळातच हीच कार मौजे हनुमानवस्ती येथे अपघातग्रस्त झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाहनाजवळ पोहोचलेल्या पोलिसांना कारमधून येणाऱ्या वासावरून गांजा सदृश्य अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. तपासणी केली असता कारमध्ये काळ्या रंगाच्या पाच गोण्या आढळल्या.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत तब्बल २१ लाख १५ हजार रुपये किमतीचा १०५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात बाबासाहेब विश्वनाथ दहातोंडे (रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) आणि दत्तु मुरलीधर सकट (रा. टाकळी खंडेश्वरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली. दोघांनीही हा गांजा नेवासा येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. पोलिसांना पाहून घाबरल्यामुळे त्यांनी कार पळवली आणि अपघात झाला, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी दत्तु सकट याला न्यायालयाने १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही धडक कारवाई सहायक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उप निरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, अनंत मस्के, राहुल शिंदे, मनोज जोगदंड, सतिश मुंडे, संभाजी भिल्लारे, अशपाक सय्यद, अर्जुन यादव, अंकुश वरपे, मनोज परजने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे यांनी केली.