Breaking
Updated: ऑक्टोबर 13, 2025
काढलेल्या सोयाबीनची यंत्राच्या साह्याने मळणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई(प्रतिनिधी) – सोयाबीनची स्थिती हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या हाहाकाराने हिरावला आहे.पण ज्या शेतकर्याचे सोयाबीन उंचीवरील शेतावर होते त्यांनी काढणी करून ढिग केले आहेत. रब्बीच्या पेरणीसाठी सोयाबीन मळणीची लगबग यंत्राच्या साह्याने सुरु आहे. आणखी कांही शेतकर्याचे सोयाबीन मात्र पाण्यातच असल्याने काढणी रखडली आहे.
तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकर्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कांही शेतकर्याची खरीपाची पेरणी वेळेवर झाली होती. मात्र परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने सोयाबीन डोहात पोहले. तर ज्या शेतकर्याची शेती उंचावरील भागात होती त्या शेतकर्याला मात्र पाण्याच्या डोहातून दिलासा मिळाला. मोठया पावसानंतरही दररोज ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस सुरूच होता. उंचावर शेती असणार्या शेतकर्यांनी काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ढिग मारले आहेत.पावसाने भिजु नये यासाठी ताडपत्री झाकली असल्याने ते शेतकरी पुन्हा झालेल्या पावसात फायद्यात राहिले आहेत. पण ज्यांची काढणी राहिली होती त्यांचे सोयाबीन मात्र पाण्याच्या डोहात आजही पोहत आहे. रब्बीच्या पेरणीसाठी दिपावलीच्या खर्चासाठी ज्या शेतकर्याचे ढिग पावसापासुन सुरक्षित होते त्या शेतकर्यांनी यंत्राच्या साह्याने मळणी सुरू केली आहे.
आणखी कांही शेतकर्याचे सोयाबीन चिखल पाण्यातच आजही पोहतच आहे. खरीप गेले रब्बीसाठी चिखलमय शेती झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. ढिग असलेले सोयाबीन चांगले वाटत असले तरी काळसर पडून उतार कमी येत आहे. बाजारातही दरवर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. चिखल पाण्यातील सोयाबीन मातीमोल भावात जात आहे. बाजारात व्यापारी सोयाबीनची खरेदी मात्र कोंबड्याचे खाद्य म्हणून खरेदी करत आहेत. डोहातल्या सोयाबीनचे पदरात तर कांही पडणार नाही पण जनावरांच्या चार्यासाठी सुद्धा भुसकट उपयोगात येणार नसुन भुसकट उकीरड्यात भरण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही परतीच्या पावसाने बहुतेक शेतकर्यांची सुगी हातची गेली असुन रब्बीच्या सुगीवरच शेतकर्याची मदार आहे.