Breaking
Updated: सप्टेंबर 17, 2025
ज्ञानराधाच्या संचालक अर्चना कुटेला तीन दिवसांची पोलीस कोठडी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालिका अर्चना सुरेश कुटे, आशा पद्माकर पाटोदेकर (पाटील) यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीआयडी) पुणे येथील बाणेर परिसरातून अटक केली होती. बुधवारी केज ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्या दोघींना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाविरुद्ध ९५ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास छत्रपती संभाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर संचालिका अर्चना कुटे, आशा पाटोदेकर या फरार झाल्या होत्या. त्या पुणे येथील बाणेर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, पोलिस उपमहानिरीक्षक अमोल गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक किरण पाटील, पोलिस उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलिस निरीक्षक विजय पणदे, कारभारी गाडेकर, देवचंद घुणावत, सय्यद रफीक यांच्या पथकाने या दोघींना अटक केली होती. त्या दोघींना केज ठाण्यात दाखल असलेल्या ज्ञानराधाच्या नांदूरघाट शाखेत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांची १ कोटी ५३ लाख ३४ हजार रुपयाला फसवणूक केल्याच्या व केज शाखेत ठेवी ठेवलेल्या ७० लाख ८३ हजार २८६ रुपयांला फसवणूक केल्याच्या दोन्ही गुन्ह्यात केज ठाण्यात आणून बुधवारी सीआयडीच्या पोलिस उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलिस निरीक्षक विजय पणदे यांनी केज येथील दुसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासमोर हजर करण्यात आले. या दोघींना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकारी पक्षातर्फे ऍड. राम बिरंगळ यांनी तर कुटे तर्फे ऍड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली.