Breaking
Updated: फेब्रुवारी 2, 2026
केजच्या बस स्टँडवर महिलेच्या पर्स मधून ३ लाख ३५ हजार रु च्या दागिन्यांची चोरी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- भावाच्या लग्नाच्या निमित्ताने माहेरी जात असलेल्या एका विवाहित महिलेच्या पर्स मधून केज च्या बस स्टँडवर ३ लाख ३५ हजार रु. चे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:४५ वाजण्याचे सुमारास केज येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहत असलेल्या अश्विनी गोविंद घोळवे या त्यांच्या भावाच्या लग्नाच्या कार्यक्रमा निमित्त लातूर येथे त्यांच्या माहेरी जात असताना त्या नाशिक-लातूर या बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्सची चैन उघडून पर्स मध्ये ठेवलेले १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मोठे पट्टीचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, असे एकूण ३ लाख ३५ हजार ९८० रु. किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
दरम्यान अश्विनी घोळवे व त्यांची मुलगी या दोघी एसटी बस मध्ये चढत असताना त्यांच्या जवळ अनोळखी दोन महिला व एक मुलगी घुटमळत होत्या. त्या अनोळखी महिलांनी त्यांच्या पर्स मधील दागिने हातोहात लांबविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी अश्विनी घोळवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ५१/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे तपास करीत आहेत.
तसेच बस स्टँड परिसरात एक पोलीस चौकी आहे. परंतु या चौकीत पुरेसे पोलिस कर्मचारी देऊन गस्त वाढविणे व बस स्टँड परिसरातील सर्व भाग सीसीटीव्हीच्या कक्षेत येण्याची व्यवस्था झाल्यास चोरीच्या घटनेला आळा बसेल. अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.