Breaking

नाफेड,एफ.सी.आय.आणि सी.सी.आय.यांनी शेतीमालाची खरेदी बाजार समितीच्या आवारात करावी

Updated: सप्टेंबर 13, 2025

By Vivek Sindhu

शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांची मागणी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांची मागणी

अंबाजोगाई – यावर्षीच्या खरीप हंगाम काढणीला लवकरच सुरुवात होणार असून नाफेड,एफ.सी.आय.आणि सी.सी.आय.यांच्यातर्फे आधारभूत किमतीने करण्यात येणारी तेलवर्गीय,डाळवर्गीय,अन्नधान्य, आणि कापूस आदि.शेतीमालाची खरेदी बाजार समितीच्या आवारातच करावी.अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आणि भारतीय किसान संघ-परिसंघ नवी दिल्लीचे सचिव कालिदास आपेट यांनी केली आहे.

बाजार समिती कायद्यातील कलम 32-ड अन्वये शेतीमालाला आधारभूत किंमत मिळवून देणे हे बाजार समितीचे कर्तव्य आहे.बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची आवक होताना मुख्य प्रवेशद्वारावर इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारे शेतीमालाचे वजन करून शेतकऱ्याला शेतीमालाच्या वर्णना सहित आवक पावती देणे बंधनकारक आहे. त्यानंतर बाजार समितीने शेतीमालाची क्लिनिंग, ग्रेडिंग करून शेतीमाल स्वच्छ करून घेणे ही बाजार समितीची जबाबदारी आहे. त्यानंतर बाजार समितीच्या सचिव,तालुका कृषी अधिकारी आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी शेतीमालाची प्रतवारी ठरविणे (एफ.ए.क्यू.दर्जा) आवश्यक आणि बंधनकारक आहे. अशी कायदेशीर प्रक्रिया करून शेतीमालाचे लिलाव करणे बाजार समितीकडून अपेक्षित आहे.

मागील दहा वर्षापासून महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये केवळ ‘मार्केट फी’ गोळा करण्याचा गोरख धंदा सुरू आहे. बाजार समितीच्या आवारात देशी दारूची दुकाने, कपडे धुण्याचे दुकान, रासायनिक खत, बियाणे, कीटकनाशके विक्रीची दुकाने, सिमेंट,बांधकाम साहित्य विकणारे, पतपेढ्या, मल्टीस्टेट, फायनान्स, टायरची दुकाने, फटाके, बिअर बार, हॉटेल,किराणा माल, घरगुती भांडी, कापड,मेडिकल, हेअर कटिंग सलून अशी विविधांगी दुकाने थाटली आहेत. केवळ पोट भाडेकरू ठेवून किराया वसूल करण्याचा धंदा बाजार समितीच्या मार्फत केला जातो.शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी कसलाही प्रयत्न बाजार समित्या करताना दिसत नाहीत.नाफेड,एफ. सी.आय.आणि सी.सी.आय.यांनी आधारभूत किमतींने शेतीमाल खरेदीसाठी स्वतंत्र कमिशन एजंट नेमले आहेत. या खरेदीदार संस्थांचा सुळसुळाट झाला असून अनेकांनी गैरमार्ग अवलंबून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. याला आळा घालण्यासाठी बाजार समिती मधील परवानाधारक आडत्याकडून नाफेड,एफ.सी.आय., सी.सी.आय. या केंद्र सरकारच्या शेतीमाल खरेदीदार संस्थांनी शेतीमालाची अधिकृतपणे खरेदी करावी. अशी मागणी कालिदास आपेट यांनी केली आहे.


Categories

Recent Posts