Breaking
Updated: जानेवारी 20, 2026
सार्वजनिक बांधकाम विभागावर तीव्र निदर्शने
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसार्वजनिक बांधकाम विभागावर तीव्र निदर्शने
अंबाजोगाई: येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डी.वाय.एफ.आय.) च्या वतीने आज जोरदार निदर्शने करण्यात आली. अंबाजोगाई-मोहा-सिरसाळा हा राज्य रस्ता आणि परळी-नागापूर-बोधेगाव-मोहा हा जिल्हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्थेत असल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गेल्या तीन वर्षांपासून मंजूर असलेला हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नसल्याचा आरोप करत संतप्त युवकांनी आज प्रशासनाला जाब विचारला.
या आंदोलनादरम्यान मुकुंदराज परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्नही प्रकर्षाने मांडण्यात आला. या मार्गावरील खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संघटनेने यापूर्वी अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज हे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनाची तीव्रता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी केली आणि १० फेब्रुवारीपर्यंत दोन्ही रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर युवकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, प्रशासनाने दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा ताबा घेऊन बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. रवींद्र देवरवाडे, व्यंकट ढाकणे, आबा कांबळे, आणि प्रवीण देशमुख उपस्थित होते. तसेच डी.वाय.एफ.आय. युवक संघटनेचे जिल्हा सचिव विशाल देशमुख, राज्य कमिटी सदस्य प्रशांत म्हस्के, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटोळे, राहुल भावटणकर, परळी तालुकाध्यक्ष विजय घुगे, मुंजा नवगरे, सिद्राम सोळंके, जगदीश देशमुख, अशोक वाघमारे, प्रशांत देशमुख, पृथ्वी देशमुख, प्रकाश कावळे, मदन राठोड, एकनाथ पांचाळ, अशोक जाधव आणि प्रकाश घाडगे यांच्यासह अनेक युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.