Breaking
Updated: फेब्रुवारी 28, 2026
गोविंद फड यांची मनोज जरांगेंना थेट धमकी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगोविंद फड यांची मनोज जरांगेंना थेट धमकी
परळी – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत मनोज जरांगे पाटील यांना थेट धमकी दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर कार्यक्रम खल्लास… जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय,” अशा आशयाची ही पोस्ट सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून तो सध्या तुरुंगात आहे. या घटनेवरून जरांगे पाटील यांनी मुंडेंवर गंभीर आरोप करत सडकून टीका केली होती.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला मारण्याचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणात अमोल खुणे नावाच्या तरुणाला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती, जो सध्या जामिनावर बाहेर आहे. या कटामागेही राजकीय हात असल्याचा संशय जरांगे यांनी व्यक्त केला होता, ज्यामुळे परळी आणि आसपासच्या परिसरात तणाव वाढला होता.
गोविंद फड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह आमदार सुरेश धस यांचाही उल्लेख केल्याचे समजते. ‘धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय’ असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. “भंडारा लावून बोलतोय” या शब्दांतून त्यांनी दिलेली ही चेतावणी थेट संघर्षाला आमंत्रण देणारी असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात अद्याप गोविंद फड किंवा धनंजय मुंडे यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र सोशल मीडियावर या पोस्टमुळे आता वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.