Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पतीने मोबाईल घेऊन दिला नाही; पोटच्या गोळ्यासह मातेची विहिरीत उडी, दोघांचाही करुण अंत

Updated: फेब्रुवारी 1, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 02 01 at 7.38.16 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: पतीने मोबाईल घेऊन दिला नाही या रागातून एका २४ वर्षीय महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील लिंबारूई शिवारात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४ वर्ष, रा. लिंबारूई, ता. जि. बीड) असे मृत महिलेचे नाव असून, तिने आपला मुलगा वेदांत (वय ३ वर्षे ५ महिने) याच्यासह हे टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता ही मागील काही दिवसांपासून पतीकडे नवीन मोबाईलची मागणी करत होती. मात्र, पती रामेश्वर बाबासाहेब दराडे यांनी मोबाईल घेऊन न दिल्याने त्यांच्यात वाद झाले होते. याच कारणावरून आलेल्या संतापाच्या भरात प्राजक्ताने आपल्या चिमुकल्या मुलासह  विहिरीत उडी घेतली. या घटनेत मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. 

ही घटना ३१ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. सुरुवातीला या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलीस चौकशी दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. फिर्यादी रामेश्वर दराडे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी या घटनेचा सविस्तर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिमुरड्या वेदांतचा पाण्यात बुडवून खून केल्याप्रकरणी मयत प्राजक्ता हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज करत आहेत. एका क्षुल्लक कारणावरून दोन जीवांचा असा अंत झाल्याने लिंबारूई परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts