Breaking

चेक बाऊन्स प्रकरणी हॉटेल मालकाला चार महिने कारावास

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

InShot 20260410 085721593

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

३.६१ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

अंबाजोगाई: लातूर येथील ७ व्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात चेक बाऊन्स प्रकरणी हॉटेल व्यावसायिकाला दोषी ठरवत चार महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मांजरसुंबा (जि. बीड) येथील नैवेद्यम हॉटेलचे मालक श्रीनिवास साहेबाव कदम यांनी उसने घेतलेली रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. याशिवाय तक्रारदाराला व्याजासह ३ लाख ६१ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, लातूर येथील प्रकाश मनोहर पाटील आणि आरोपी श्रीनिवास कदम यांची जुनी ओळख होती. एप्रिल २०१५ मध्ये कदम यांनी आपल्या व्यवसायातील आर्थिक संकट आणि घरगुती कारणांसाठी पाटील यांच्याकडून ६ लाख ७५ हजार रुपये उसने घेतले होते. यापैकी काही रक्कम कदम यांनी परत केली होती, मात्र उर्वरित रकमेच्या परतफेडीसाठी त्यांनी १० जुलै २०१७ रोजी २ लाख रुपयांचा धनादेश पाटील यांना दिला होता. पाटील यांनी हा धनादेश बँकेत जमा केला असता, संबंधित बँक खाते आधीच बंद असल्याच्या कारणावरून तो न वटताच परत आला.

आपली रक्कम परत न मिळाल्याने प्रकाश पाटील यांनी लातूर न्यायालयात धाव घेत कायदेशीर दाद मागितली होती. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपी श्रीनिवास कदम अनेकदा गैरहजर राहिला. न्यायालयाने तक्रारदाराने सादर केलेले पुरावे आणि त्यांच्या विधीज्ञांनी केलेला भक्कम युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीला चार महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच मूळ रकमेवर ९ टक्के व्याज आणि खटल्याचा खर्च मिळून एकूण ३ लाख ६१ हजार रुपये नुकसान भरपाई ३० दिवसांच्या आत तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम विहित मुदतीत न दिल्यास आरोपीला अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल. या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने ॲड. अनंत व्ही. देशमुख यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. जगदीश व्ही. बजाज, ॲड. महेश डी. माने आणि ॲड. आकाश पी. कदम यांनी सहकार्य केले.


Categories

Recent Posts