Breaking
Updated: एप्रिल 11, 2026
बारदाण्याअभावी हरभरा खरेदी केंद्र आठ दिवसांपासून बंद; शेतकरी अडचणीत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकिल्लेधारूर – नाफेड अंतर्गत धारूर शहरातील खरेदी-विक्री संघाच्या वतीने स्थानिक बाजार समितीत सुरू असलेले शासकीय हरभरा खरेदी केंद्र मागील आठ दिवसांपासून बंद असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी नोंदणी केलेले शेकडो शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
तालुक्यात यंदा सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती. परतीच्या पावसामुळे उत्पादनही समाधानकारक झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अपेक्षेने आपला माल शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणत आहेत. मात्र बारदाण्या अभावी खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने स्थानिक बाजाराचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.सध्या स्थानिक बाजारात हरभऱ्याला ५२०० ते ५३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, शासनाने निश्चित केलेला हमीभाव ५७८० रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे ४०० ते ५०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेले खरेदी केंद्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वेळेवर सेवा देण्यात अपयशी ठरत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.दरम्यान, नियोजनातील त्रुटींमुळेच बारदाण्याची कमतरता निर्माण झाली असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. खरेदी केंद्र वेळेत सुरू राहावे, यासाठी आवश्यक नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने बारदाण्याची उपलब्धता करून खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू करावी, तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत.
((कोट))
मी नोंदणी करून बरेच दिवस झाले आहेत खरेदी साठी माझा नंबर देखील आला आहे मात्र खरेदी विक्री संघाकडे पोते उपलब्ध नसल्याने खरेदी केंद्र बंद आहे याबाबत तेथे कार्यरत असलेले कर्मचारी यांना संपर्क केला असता फोन घेत नाहीत यामुळे तेथील परिस्थिती लक्षत येत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ बारदाण्याचा पुरवठा सुरळीत करावा
कुलदीप दरेकर(शेतकरी)