Breaking

बनावट सोने देऊन बँकेची फसवणूक; बीडच्या सराफा व्यापाऱ्याला पुण्यातून केले जेरबंद

Updated: नोव्हेंबर 5, 2025

By Vivek Sindhu

बीडच्या सराफा व्यापाऱ्याला पुण्यातून केले जेरबंद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : बनावट सोने गहाण ठेवून बँक ऑफ बडोदा या बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बीड येथील एका सराफा व्यापाऱ्याला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. या व्यापाऱ्याने स्वतःच्या फायद्यासाठी १६ बनावट ग्राहक तयार करून त्यांच्यामार्फत बँकेकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पोबारा केला होता.

याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी विलास उदावंत (रा. पंडित नगर, नगर रोड, बीड) हा ‘विलास ज्वेलर्स’ नावाचे दुकान बीड येथे चालवत होता. त्याने जलद श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी सामान्य नागरिकांना जास्त सोन्याचे किंवा परताव्याचे खोटे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत एकूण अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा केले. त्यानंतर बीडमधील आपली मालमत्ता विकून तो पसार झाला होता आणि त्याने सर्व संपर्क तोडले होते.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास उदावंत पुणे जिल्ह्यातील देहूगाव येथे ‘व्यंकटेश ज्वेलर्स’ नावाने सोन्या-चांदीचे दुकान चालवत असल्याचे उघड झाले. बीड शहर पोलीस ठाण्याने तातडीने पथक नेमून त्याला देहूगाव येथील दुकानातून अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल १८ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
उदावंत याने सोन्याचे कर्ज (गोल्ड लोन) देणाऱ्या बँका आणि खासगी वित्त कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या ‘गोल्ड लोन’ योजनेचा गैरफायदा घेतला. त्याने बनावट सोने तयार करून घेतले आणि ते सोने तपासून देणारा म्हणून बँकेला ते खरे असल्याचे भासवले. बँकेने त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवल्यामुळे हे कर्ज वाटप झाले. उदावंत याच्या या कृत्यामुळे ज्या सामान्य लोकांची फसवणूक झाली होती, त्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाबा राठोड, पोलिस अंमलदार राम पवार, सुशेन उगले, शौकत शेख यांनी पार पाडली.

नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता खाजगी व्यक्तींकडे स्वतःचे सोने गहाण ठेवू नये आणि केवळ सोनार आहे म्हणून लगेच विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, बँकांनीही सोने परीक्षकांची नेमणूक करताना पूर्ण खात्री करून घ्यावी आणि त्यांच्या कामकाजावर सतत लक्ष ठेवावे, अशी सूचनाही या निमित्ताने करण्यात आली आहे.


Categories

Recent Posts