Breaking
Updated: मार्च 24, 2026
पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel
बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस स्टेशनच्या पथकाने सुशी (वडगाव) शिवारात धडक कारवाई करत ज्वारीच्या पिकात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्या एका ६० वर्षीय इसमाला अटक केली आहे. भाऊसाहेब तात्याबा तुरुकमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातुन १ लाख ७४ हजार रुपये किमतीचा ५ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आर्थिक फायद्याच्या उद्देशाने स्वतःच्या शेतात अमली पदार्थाचे पीक घेतल्याप्रकरणी आरोपीवर एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिलेल्या कडक निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली. सुशी शिवारातील गट नंबर २३४ मधील शेतात ज्वारीच्या पिकाच्या आड गांजाची झाडे लावली असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांनी कायदेशीर पूर्तता करून कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी धाड टाकली.
या शोध मोहिमेदरम्यान शेतात गांजाची एकूण ४२ झाडे आढळून आली, जी पोलिसांनी तात्काळ जप्त केली. ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि लंके, सपोनि जंजाळ व त्यांच्या पथकाने पार पाडली. यामध्ये फॉरेन्सिक पथकासह कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.