Breaking

पिंपळनेरमध्ये कांद्याच्या आड अफूची बेकायदेशीर शेती; पोलिसांच्या छाप्यात १०.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Updated: फेब्रुवारी 27, 2026

By Vivek Sindhu

पोलिसांच्या छाप्यात १०.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पिंपळनेर पोलिसांनी शुक्रवारी मौजे पिंपळनेर शिवारातील एका शेतावर धाड टाकून कांद्याच्या पिकात लपवून केलेली अफूची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास केलेल्या या धाडसी कारवाईत पोलिसांनी अंदाजे १० लाख ५८ हजार ८७५ रुपये किमतीची ४२ किलो ३५५ ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी शेतमालक आरोपी विशाल भगवान इतापे याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाला विशाल इतापे हा आपल्या शेतात अफूच्या झाडांची बेकायदेशीर जोपासना करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने आणि महसूल विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पोलिसांनी संबंधित शेताची झाडाझडती घेतली. यावेळी कांदा आणि लसूण पिकाच्या मध्यभागी अत्यंत हुशारीने लपवून लावलेली अफूची हिरवीगार झाडे पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून हस्तगत केली असून त्यांचे वजन ४२ किलोहून अधिक भरले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उप अधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. घुगे, पोउपनि गोलवाल, शिंदे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मोहिमेत महसूल विभागाचे प्रतिनिधी म्हणून ग्राम महसूल अधिकारी प्रशांत ढोले आणि कृषी सहाय्यक शिंदे उपस्थित होते. आरोपी विशाल इतापे याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क) आणि १५ अन्वये कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts