Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Updated: फेब्रुवारी 6, 2026

By Vivek Sindhu

६ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

६ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अंबाजोगाई: शहरातील बाराभाई गल्ली परिसरात झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना अवघ्या काही दिवसांत यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, बाराभाई गल्ली येथील रहिवासी काझी मोहम्मद अलीमुद्दीन करीमुद्दीन (वय ६५ वर्षे, व्यवसाय – व्यापार) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात दोन इसमांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ४ लाख रुपयांची रोकड आणि ७ लाख ७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ११ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि पठाण मोहम्मद रियाज खॉन मोहम्मद इकबाल मोहम्मद (वय २५ वर्षे, रा. बाराभाई गल्ली) व सलमान मुस्तफा शेख (वय ३१ वर्षे, रा. झारेगल्ली) या दोन संशयितांची नावे निष्पन्न केली. पठाण मोहम्मद रियाज याला गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ९० हजार रुपये रोख आणि ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी दुसरा आरोपी सलमान मुस्तफा शेख याला अटक करून त्याच्याकडून ५२ ग्रॅम सोने आणि ५३७ ग्रॅम चांदी असा ३ लाख ६० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोंगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, श्रीकृष्ण वडकर, तेजस वाव्हुळे, पांडुरंग काळे, हनुमंत चादर, युवराज राठोड, सुशांत गायकवाड, भागवत नागरगोजे यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करत आहेत.


Categories

Recent Posts