Breaking
Updated: नोव्हेंबर 1, 2025
मित्राने साथीदाराच्या मदतीने केली फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमित्राने साथीदाराच्या मदतीने केली फसवणूक
केज – एका व्यापाऱ्यास लहानपणीच्या मित्राने त्याच्या मित्राला पैशाची गरज असल्याचे सांगून ”थार” गाडी गहाण ठेवून त्याबदल्यात पाच लाख रुपये घेतले. काही तासात व्यापाऱ्याच्या ताब्यातील गाडी घेऊन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार जिरेवाडी (ता. परळी) येथील एका व्यापाऱ्यासोबत घडला. गाडीचा करारनामा, नोटरी व पैशाचा व्यवहार केज शहरात घडल्याने याप्रकरणी पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जिरेवाडी येथील व्यापारी राहुल रामहरी कांदे यांना ३० जुलै रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान त्यांचा लहानपणीचा मित्र संजय गुलाब पवार (रा. नाथ टॉकीजचे पाठीमागे शिवाजीनगर, परळी) याने फोन करून त्याच्या मित्राला पैशाची गरज असून त्याची ”थार” गाडी गहाण ठेवण्यास तो तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर गाडीचे फोटो, आरसी बुक पाठविले. त्या गाडीचा क्र. एम. एच. १२ डब्ल्यूके २२७६ असा आणि ती गाडी प्रताप शेषेराव राठोड (रा. पुणे जि.पुणे) याच्या नावावर होती. त्यांना ”थार” गाडीचे आकर्षण असल्याने त्यांनी त्या गाडी मालकाला परळीला बोलवून घेण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी चार ते साडेचार वाजता संजय याने त्यांना फोन करून गाडी मालक केजला असून पाच लाख रुपये घेऊन त्याच्याकडे जाऊ असे सांगितले. राहुल कांदे हे त्यांचा मित्र आनंद मुंजाजी धाटे (रा. भिमवाडी परळी) कलीम पटेल, (रा. आजाद नगर परळी), नितीन तौर (रा. साठेगल्ली परळी) यांना घेऊन जीपने अंबाजोगाईला आले. तेथून संजय पवार व त्याचा मित्र शहबाज खान (रा. हबीबपुरा परळी) गाडीत बसले. ते सर्व धारूरला आले. त्या ठिकाणी गाडी मालक प्रताप राठोड व गणेश नडगीरे (रा. धारुर) हे भेटले. त्यांनी केजला येऊन एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन बॉन्डवर करारनामा टाईप केला. रात्री दहा वाजता ऍड. प्रगती केशवराव केंद्रे (रा. शिक्षक कॉलनी केज) यांच्या घरी जाऊन सदर करारनाम्याबाबत नोटरी केली. त्यांना पैसे देऊन ”थार” गाडी घेऊन मध्यरात्री १ वाजता परळीला गेले. त्यांनी ही गाडी समोर लावून झोपले. त्यानंतर सकाळी सहा वाजता झोपेतून उठले, घरासमोरून गाडी गायब झाली होती. ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता रवी मुंडे (रा. अंबाजोगाई) याने ती गाडी गाडीचा मालक प्रताप राठोड हाच घेऊन गेल्याचे व तो तुमचे पैसे परत देणार असल्याचे सांगितले. तो तुमचे पैसे दोन ते तीन दिवसात परत करणार असे सांगितल्याने ते परत घरी आले. त्यानंतर त्यांना पैसे मिळून जातील, असे सांगून आतापर्यंत पैसे न देता त्यांची फसवणूक केली. शेवटी १ नोव्हेंबर रोजी राहुल कांदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय पवार, शहबाज खान, रवि मुंडे, गणेश नडगीरे, प्रताप राठोड या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार जावेद कराडकर हे करीत आहेत.