Breaking
Updated: जानेवारी 31, 2026
लांडग्यांच्या हल्ल्यात बोकडासह पाच शेळ्यांचा मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – दावणीला बांधलेल्या शेळ्यांवर अचानक येऊन लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात एका बोकडासह पाच शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना लाडेगाव (ता. केज) शिवारात शनिवारी पहाटे २ वाजेच्या नंतर घडली. यामध्ये शेतकऱ्याचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
लाडेगाव (ता. केज) येथील शेतकरी अमीन दस्तगिर शेख यांची लाडेगाव शिवारात पावनधाम कॉर्नरजवळ सर्वे नं. १३५ मध्ये जमीन आहे. शेतीसह शेळीपालनाचा जोडव्यावसाय करतात. शुक्रवारी रात्री शेळ्या चारून आणल्यानंतर त्यांनी शेळ्या या दावणीला बांधल्या होत्या. शनिवारी पहाटे २ वाजेच्या नंतर अचानक आलेल्या लांडग्यांने शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच शेळ्या आणि एक बोकड मरण पावले. या घटनेची माहिती मिळताच धारूर वनविभागाचे वनपाल व्ही. एन. पवार, वनसेवक वचिष्ट भालेराव यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करीत पंचनामा केला आहे. या ठिकाणी त्यांना लांडग्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने हा हल्ला लांडग्यांनी केल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या हल्ल्यात पाच शेळ्या व एक बोकड मरण पावल्याने शेतकरी अमन शेख यांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या परिसरात लांडग्याच्या कळपाचा वावर
संबंधित ठिकाणी लांडग्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला केला आहे. गांजपुरपासून ते लाडेगावपर्यंतच्या परिसरात लांडग्यांच्या कळपाचा वावर आहे. शेळी पालकांनी खबरदारी घ्यावी.
– नवनाथ पाईक , वनरक्षक, वन विभाग, धारूर.
हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा
शेळ्यांचा हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे धारूरच्या वन विभागाने चंदनसावरगाव, जवळबन, होळ, भाटुंबा, लाडेगाव, बोरीसावरगाव, औरंगपूर, सावळेश्वर या परिसरात वॉच ठेवून अशा प्रकारच्या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
कुलदीप करपे
जिल्हाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना बीड.